चिपळुणातील पंधरा गाव विभागाचा संपर्क तुटलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:38+5:302021-07-27T04:32:38+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील पंधरा गाव विभागातही महापूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील पंधरा गाव विभागातही महापूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने या भागाचा अजूनही या गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्याशिवाय कोणतीही शासकीय यंत्रणा या भागात पोहोचली नसल्याने ओरड केली जात आहे.
महापूर व अतिवृष्टीमुळे चिपळूण पूर्व भागात खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. या भागातील अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले असून, काही घरांनाही फटका बसला आहे, तसेच मुख्य रस्त्यावरील चार पूल आणि पाच साकव वाहून गेले. नांदिवसे, ओवळी, कळकवणे, तिवरे, आकले, कादवड, इंदापूर, तिवडी, रिक्टोली, गाणे, दादर, स्वयंदेव, वालोटी, खडपोली गावांच्या दळणवळणाचा मार्गच बंद झाला आहे, तसेच विद्युत खांबही उन्मळून पडल्याने वीज पुरवठाही खंडित झाला.
अतिवृष्टिमुळे नांदिवसे स्वयंदेव या ठिकाणी काशीनाथ शिवराम कातुरडे यांच्या घरावर दरड कोसळली असता, आजुबाजूच्या अकरा कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. बावलाई - नांदिवसे येथे घरामधून जमिनीला भेगा पडल्याने तेथील पाच कुटुंबांना तत्काळ ग्रामस्थांनी तात्पुरते स्थलांतरीत केले आहे. त्याचबरोबर नांदिवसे, दादर व कळकवणे गावच्या नळपाणी योजनेच्या विहिरी, पंप हाऊस आणि पाइपलाइन वाहून गेले आहे. दसपटी पूर्व विभाग आजही अंधारात आहे.
---------------------
तिवरे गावात पुन्हा अस्मानी संकट
तिवरे गावामध्ये दरड कोसळून घराच्या बाजूला आली आहे. त्याठिकाणी वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण टीमला सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच त्या ठिकाणच्या नागरिकांची तात्पुरती राहण्याची व्यवस्था मंदिरामध्ये केली आहे. यानंतर रिक्टोली गावांमध्ये इंदापूर येथे भेगा पडल्या आहेत. सत्तर ते ऐंशी कुटुंबांची व्यवस्था दुसऱ्या शाळेमध्ये केली आहे. तिवडी या गावाकडे जाण्याचा रस्ता वाहून गेल्यामुळे संपर्क तुटला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अभियंता यांना सूचना देण्यात आल्या आहेत.