सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात पावसाची संततधार कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:44+5:302021-07-16T04:22:44+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर अधिकच वाढला असून, सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे काही भागात ...
रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचा जोर अधिकच वाढला असून, सलग पाचव्या दिवशी जिल्ह्यात पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे काही भागात पूरपरिस्थिती कायम आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात एकूण ८०१.६० (सरासरी ८९.०७ ) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक १२० मिलीमीटर इतका पाऊस लांजा तालुक्यात झाला असून, त्याखालोखाल मंडणगड तालुक्यात १०२.१० मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. उसगाव येथील कृष्णा धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच शंकर जानू गोरे यांच्या घराचे ८ हजार रुपये व जनार्दन धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: २९ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात वारदई येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे ३ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे २७ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा बांध पावसामुळे पडल्याने घराचे अंशत: १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी तालुक्यातील भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.
गुरुवारीही पावसाचा जोर कायम आहे. दापोली, मंडणगड आणि खेडमध्ये तुरळक सरी कोसळत असल्या तरी राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण आणि गुहागर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे गुरुवारी या तालुक्यांमध्ये काही ठिकाणी पूरपरिस्थिती कायम आहे.