चिपळूण विभागातील पन्नास टक्के वीज पुरवठा पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:56+5:302021-07-27T04:32:56+5:30
रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, ...
रत्नागिरी : चिपळूण शहरात पूरजन्य परिस्थिती ओढवल्याने विभागातील ५० हजार ९७७ ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, पाणी ओसरल्यानंतर महावितरणच्या पथकाने प्रयत्न करून आतापर्यंत २५ हजार ९३७ ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत केला असला, तरी अद्याप २५ हजार ४० ग्राहकांचा वीज पुरवठा बंद आहे.
पुराचा वेढा शहर व परिसराला बसल्याने पाण्यामध्ये वीज पुरवठा सुरू ठेवणे धोकादायक होते. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा बंद करण्यात आला. मात्र, २४ तासांपेक्षा अधिक काळ पाणी राहिल्याने पाच हजारपेक्षा अधिक वीज मीटर नादुरूस्त झाले आहेत. इमारतींच्या दोन मजल्यांपर्यंत पाण्याची उंची राहिल्याने घरातील, दुकाने, कार्यालयातील विजेची उपकरणे नादुरूस्त झाली आहेत शिवाय विजेचे वायरिंग, मीटरही खराब झाले आहेत. त्यामुळे वीज पुरवठा विजेच्या खांबापर्यंत पूर्ववत करण्यास यश प्राप्त झाले असले, तरी घरातील वायरिंग, वीज मीटर, बोर्ड, स्वीच, विजेचे दिवे यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. तसेच आवश्यकता असेल तर ते बदलावेत अन्यथा त्याच परिस्थितीत वीज पुरवठा सुरू करणे धोकादायक आहे.
खेड येथील १,४८,०८७, रत्नागिरी विभागातील १,१५,२७३ आणि चिपळूण विभागात ५०,९७७ मिळून एकूण ३,१४,३३७ वीज जोडण्या जिल्ह्यात बंद पडल्या होत्या. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर २४ तासांत २,८७,७३७ वीज जोडण्या सुरू करण्यात आल्या आहेत.
खेड, चिपळूण, राजापूर तसेच संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने वीज यंत्रणा पाण्यात बुडाल्याने आपत्कालिन परिस्थितीत वीज पुरवठा बंद करणे भाग पडले होते. चिपळुणातील महावितरणच्या चार उपकेंद्रांत पाणी भरले होते. खेर्डी उपकेंद्रात सात फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे सर्व पॅनल, वीज यंत्रणा चिखल, गाळाने भरली आहे. पूर ओसरताच चारपैकी एक उपकेंद्र सुरू करण्यात आले. प्रथम सर्व कोरोना रूग्णालयांतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला. यानंतर प्रत्यक्ष ज्या वीजवाहिन्या पाण्याला स्पर्श करत नाहीत व धोकादायक ठरू शकत नाहीत, अशा ठिकाणीच वीज पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, विशाल शिवतारे व कैलास लवेकर हे प्रत्यक्ष भागात कार्यरत असल्याने अनेक निर्णय तातडीने घेत अंमलबजावणी करणे शक्य झाले.