शिक्षकांची पन्नास टक्केच उपस्थिती, निर्णयाचे होते पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:21 AM2021-06-19T04:21:41+5:302021-06-19T04:21:41+5:30
मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासननिर्णयानुसार मंगळवार(दि. १५)पासून शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन पद्धतीनेच अध्यापन ...
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शासननिर्णयानुसार मंगळवार(दि. १५)पासून शाळा सुरू झाल्या आहेत. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन पद्धतीनेच अध्यापन सुरू झाले आहे. शासनाने कोरोनामुळे शाळेत शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीची अट जारी केली आहे. अनेक शिक्षक जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार कोरोना ड्युटीवर आहेत. शासननिर्णयाचे जिल्ह्यातील शाळांमध्ये पालन करण्यात येत असून ५० टक्के उपस्थिती ठेवण्यात येत आहे.
एप्रिलपासून शाळा बंद झाल्या. वार्षिक परीक्षा रद्द करून मुलांना सरसकट पास करण्यात आले. त्यामुळे शिक्षकांना परीक्षा घेणे, पेपर तपासणीचे काम नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार शिक्षकांना कोरोना ड्युटीसाठी नियुक्त करण्यात आले. अद्याप काही शिक्षक कोरोना ड्युटीवर आहेत. मात्र, सहकारी शिक्षक शाळा सांभाळत आहेत. ऑनलाईन पद्धतीनेच अध्यापन करण्यात येत आहे. शिक्षकांना शाळेत जावून ऑनलाईन अध्यापन व अन्य कार्यालयीन कामकाज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ज्या शाळांमध्ये विलगीकरण कक्ष आहेत, त्या शाळेच्या शिक्षकांनी घरातूनच ऑनलाईन अध्यापन करण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या असून त्याचे पालन शाळांमधून करण्यात येत आहे. मात्र ज्या गावात मोबाईल नेटवर्क नाही तेथील विद्यार्थ्यांचा प्रश्न असून पालक, ग्रामस्थांच्या सहकार्यातून ऑफलाईन अध्यापनासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
संचालकांच्या पत्राचे पालन
पहिली ते नववी व अकरावीसाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती, दहावी व बारावीच्या शिक्षकांना शंभर टक्के, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी शंभर टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे. शिवाय प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी शंभर टक्के उपस्थित राहणे आवश्यक आहे. इयत्ता दहावी व बारावीचा निकाल तयार करण्यासाठी मूल्यांकनाचे काम सुरू असून वेळेची मर्यादा असल्याने १० व १२ वीच्या शिक्षकांना शंभर टक्के उपस्थिती सक्तीची केली असून त्याचे पालन केले जात आहे.
शिक्षण विभागाची सहमती
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, मुख्याध्यापक उपस्थितीबाबत शिक्षण संचालकांनी सूचनापत्र शिक्षण विभागाला पाठविले आहे. त्यानुसार शिक्षण विभागाकडून शाळांना पत्र पाठविण्यात आले असून संचालकांच्या पत्राला शिक्षण विभागाने सहमती दर्शविली आहे. अनेक शिक्षक अद्याप कोरोना ड्युटी करत आहेत. त्यामुळे सहकारी शिक्षक त्यांची जबाबदारी सांभाळत आहेत. ऑनलाईन अध्यापन असले तरी शाळेत जावून करण्याच्या सूचना आहेत, मात्र विलगीकरण कक्ष असलेल्या शाळांच्या शिक्षकांना सवलत दिली आहे.
शिक्षण संचालकांनी कोरोनामुळे शाळांमध्ये शिक्षकांना ५० टक्के उपस्थिती तर दहावी व बारावीचे निकाल तयार करायचे असल्याने या वर्गाच्या
शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांना १०० टक्के उपस्थिती ठेवण्याचे सूचित केले आहे. त्यानुसार सर्व शाळांना सूचना केल्या असून त्याचे पालन करण्यात येत आहे.
- नीशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी
अध्यापन ही जबाबदारी असली तरी कोरोना ड्युटीही महत्त्वाची आहे. गेले दोन वर्षे अध्यापनाव्यतिरिक्त अन्य कामे करावी लागत आहे. मात्र, अनुभव वेगळा आहे. सध्या ड्युटीवर असल्याने अध्यापन शक्य नाही; परंतु शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार सहकारी शिक्षक सांभाळून घेत आहेत. कोरोना ड्युटी संपल्यानंतर लवकरच अध्यापन सुरू करणार आहे.
- एस. एल. पाटील, शिक्षक
कोरोना ड्युटीसाठी ठरावीक दिवस ठरवून दिले आहेत. नियुक्त सर्व शिक्षक जबाबदारीने काम सांभाळत आहेत. ऑनलाईन शाळा सुरू झाल्या आहेत. शासनाच्या सूचनेनुसार ऑनलाईन अध्यापन करण्यात येत आहे. उपस्थितीची अट असली तरी सहकारी शिक्षक प्रामाणिकपणे काम करत आहेत.
- दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ.