जयंती कार्यक्रम संपताच वळके येथे दाेन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:41+5:302021-04-16T04:31:41+5:30
पाली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करुन विभागात डॉ. आंबेडकर जयंती साजरी होत असतानाच वळके (ता. रत्नागिरी) येथे ...
पाली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करुन विभागात डॉ. आंबेडकर जयंती साजरी होत असतानाच वळके (ता. रत्नागिरी) येथे दोन गटांत झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परांविरोधात येथील पाली पोलीस दूरक्षेत्रात तक्रारी दाखल केल्या असून दोन्ही गटांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.
स्थानिक पातळीवर वळके बौद्धवाडीतील विहारात जयंती कार्यक्रम पार पाडल्यानंतर सध्या रत्नागिरीत राहणारा व कार्यक्रमानिमित्त घरी आलेला विश्वदीप विजय सावंत व त्याचे दोन मित्र राज विजय भाताडे आणि ऋत्वीका दीपक रहाटे (रा. रत्नागिरी) यांनी विहाराच्या बाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तेव्हा तेथील संघाचे सदस्य उमेश लक्ष्मण सावंत यांनी त्यांना हटकले असता या तिघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या वृद्ध व युवकांनाही तिघांनी मारहाण व शिवीगाळ केली. त्यामुळे उमेश सावंत यांनी तात्काळ पाली पोलीस दूरक्षेत्र गाठून युवकांविरोधात तक्रार दाखल केली.
तर मारहाण करणाऱ्या विश्वदीप याच्या वडिलांनी विजय भिकाजी सावंत यांनी राजाराम जयराम सावंत, अभिषेक राजाराम सावंत, दीपक विलास सावंत हे तिघे माझ्या घरी येऊन माझा मुलगा विश्वदीपक आणि त्याचे दोन मित्र यांना घराच्या बाहेर बोलावून जबर मारहाण केल्याची व शिवीगाळ केल्याची तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला.