Ratnagiri: समुद्रात बारा तास मृत्यूशी झुंज, पाच खलाशी बचावले; जयगड-हर्णैमध्ये मासेमारी नौका उलटली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 07:13 PM2024-01-05T19:13:33+5:302024-01-05T19:15:46+5:30
आलो तर तुमचा, नाहीतर देवाचा
दापोली : तब्बल बारा तास खोल समुद्रात पाण्याशी झुंज देत पाच खलाशांनी आपले जीव वाचविले आहेत. ही घटना जयगड ते हर्णै दरम्यानच्या समुद्रात घडली. त्यातही त्यांच्यातीलच एक खलाशी नरेंद्र चौगुले यांनी तब्बल पावणेसात तास पोहून एक मासेमारी नौका गाठली आणि मदत मिळवून सर्व खलाशांना सुखरूप किनाऱ्यावर आणले.
दि. २४ डिसेंबरला घडलेली ही घटना आता पुढे आली आहे. हर्णै बंदरातील बोट २४ डिसेंबरला खोल समुद्रात मासेमारी करीत होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एक मालवाहू पॅसेंजर बोट त्यांच्यासमोरून गेली आणि त्यामुळे अचानक जोराच्या लाटा उसळल्या. या लाटांमुळे मासेमारी करणारी नौका उलटली. इंजिनमध्ये पाणी गेले आणि त्या नौकेत बिघाड झाला. नौकेतील खलाशांसमोर मोठे संकट उभे राहिले. या नौकेवर नरेश रामचंद्र चौगुले, त्यांचा मुलगा पराग चौगुले, दीपक महसला (वाशी रायगड), वैभव गजानन चौगुले आणि दिलीप (वाशी रायगड) असे पाचजण होते.
चौगुले यांनी सर्वांना दिलासा देत जी गोष्ट हातात लागेल त्याला धरून तरंगत राहण्याची सूचना केली. सहा वाजता नरेश चौगुले यांनी बाकी सर्वांना तेथेच थांबविले आणि स्वत: पोहत मदतीसाठी निघाले. ते दुपारी पाऊण वाजण्याच्या दरम्यान त्यांना गोव्याच्या सीमेवरील एक नौका त्यांना लांबवर दिसली. त्या नौकेपर्यंत जाऊन त्यांना ही घटना सांगितली. इतर खलाशी होते, तेथे ही नौका आणून त्यांनी सर्वांना नौकेवर घेतले.
नरेश चौगुले यांनी आपल्या भावांना पाजपंढरी गावात फोन केला. तेथून हर्णै बंदरात फोन गेला व हर्णै बंदरातून दोन फायबर या खलाशांना परत आणण्यासाठी गेल्या. परतल्यानंतर सर्वांवर प्राथमिक उपचार करण्यात आले. नरेश चौगुले यांनी केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आलो तर तुमचा, नाहीतर देवाचा
पहाटे सहा वाजता जेव्हा नरेश चौगुले मदत आणण्यासाठी निघाले, तेव्हा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की, मी जाऊन मदत घेऊन येतो. जर आलाे तर तुमचा नाही तर देवाचा. त्यांचे हे शब्द इतरांना दिलासा देण्याबरोबरच काळजाला हात घालणारेही ठरले.