अनैतिक संबंधाच्या संशयावरून मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:23+5:302021-04-28T04:34:23+5:30
चिपळूण : पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जोरदार भांडण झाले. नंतर प्रकरण मिटवण्यासाठी चर्चा सुरू असतानाच पुन्हा जुंपली आणि ...
चिपळूण : पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून जोरदार भांडण झाले. नंतर प्रकरण मिटवण्यासाठी चर्चा सुरू असतानाच पुन्हा जुंपली आणि भररस्त्यावर जोरदार हाणामारी झाल्याची घटना रविवारी दुपारी चिपळूण पाेलीस स्थानकाजवळच घडली. त्यामध्ये एकजण जखमी झाला असून, तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कळंबस्ते येथील संजय आत्माराम कदम व राजू खोपकर या दोघांच्या पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले होते. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हे भांडण झाले होते. त्याबाबत रविवारी पोलीस स्थानकात दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावण्यात आले होते. यावेळी झालेल्या चर्चेत आम्ही एकत्र बसून समजुतीने विषय मिटवतो, असे दोन्ही बाजूचे म्हणणे आल्याने पोलिसांनी पोलीस स्थानकाबाहेर जाऊन चर्चा करा आणि सांगा, असा सल्ला दिला.
समजुतीसाठी बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरच वाद अधिक चिघळला आणि भररस्त्यात जोरदार हाणामारी झाली. यामध्ये संजय आत्माराम कदम हा जखमी झाला. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंदार शिर्के, राजू खोपकर आणि खोपकर यांची सासू या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भुवड करत आहेत.