'किरीट सोमय्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 07:20 PM2022-04-07T19:20:20+5:302022-04-07T19:47:08+5:30
रत्नागिरी : आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या किरीट सोमय्यांवर देशद्रोही म्हणून ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख ...
रत्नागिरी : आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या नावावर भ्रष्टाचार करणाऱ्या किरीट सोमय्यांवर देशद्रोही म्हणून ताबडतोब कारवाई करा, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केली. किरीट साेमय्या यांच्याविराेधात गुरुवारी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयासमाेर शिवसेनेतर्फे आंदाेलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्याविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी मनोगत व्यक्त करताना किरीट सोमय्यांवर हल्ला चढवला. सन २०१३मध्ये आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी किरीट सोमय्या यांनी मोहीम सुरु केली. सरकारने असमर्थता दर्शवल्याने किरीट सोमय्या पुढे आले होते. त्यांनी प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबे घेऊन उभे राहिले. ‘आयएनएस विक्रांत’ हा देशाच्या दृष्टीने अभिमानाचा विषय असल्याने लोकांनी सढळ हस्ते दान केले. या रकमेचं किरीट सोमय्या यांनी काय केलं? ते देशाला समजायला हवं.
ही रक्कम ते भंगारात जाऊ पाहणाऱ्या विक्रांत युद्धनौकेचे स्मारक बनविण्याकरिता राजभवन येथे जमा करणार होते. मात्र, सोमय्या यांनी गोळा केलेली रक्कम राजभवनाला मिळाली नसल्याचे आरटीआयमधून समोर आले आहे, असे विलास चाळके यांनी सांगितले.
यात किरीट सोमय्या यांनी अंदाजे १०० कोटींचा घोटाळा करून हे पैसे त्यांच्या बांधकाम व्यवसायाकरिता तसेच निवडणूक खर्चाकरिता वापरल्याचा आराेपही शिवसेनेने केला आहे. राज्य सरकारने किरीट सोमय्यांवर तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी चाळके यांनी केली.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, सहकार सेना जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हा महिला समन्वयक शिल्पा सुर्वे, शहर उपजिल्हा महिला संघटक संध्या कोसुंबकर, शहर महिला संघटक मनीषा बामणे, युवा सेना तालुका युवा अधिकारी तुषार साळवी, शहर युवा अधिकारी अभि दुडे व रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.