शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:34 AM2021-08-27T04:34:43+5:302021-08-27T04:34:43+5:30
चिपळूण भाजपची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी चिपळूण भाजपची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : चिपळुणातील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेच्या ...
चिपळूण भाजपची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
चिपळूण भाजपची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : चिपळुणातील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर फाडण्याबरोबरच भाजप महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी येथील पोलीस स्थानकात निवेदनाद्वारे केली आहे.
भाजपतर्फे जनआशीर्वाद यात्रेचे तसेच नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले होते. या जनआशीर्वाद यात्रेला गालबोट लावण्यासाठी चिपळूण तालुक्यातील शिवसैनिक चिपळूण तालुकाप्रमुख प्रताप शिंदे, शहरप्रमुख उमेश सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले होते. प्रत्येक ठिकाणी गलिच्छ भाषेत घोषणाबाजी सुरू होती. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहादूरशेख नाका येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यास नारायण राणे गेले असता, शिवसैनिकांनी गलिच्छ भाषेत घोषणाबाजी सुरू केली. तसेच महिलांना शिवीगाळ करण्यात आली. जनआशीर्वाद यात्रा बहादूरशेख नाक्यातून पुढे आल्यावर जमलेल्या शिवसैनिकांनी बहादूरशेखनाक्यातील बॅनर फाडले.
शिवसेनेच्या या सर्व पदाधिकाऱ्यांमुळे तालुक्यातील वातावरण कलुषित करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे या सर्व शिवसैनिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आपल्याकडून या संपूर्ण प्रकाराबाबत चार दिवसांत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, तर भाजपतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, नगरसेवक परिमल भोसले, तालुका सरचिटणीस वसंत ताम्हणकर, भाजप तालुका उपाध्यक्ष सचिन चव्हाण, युवा मोर्चा माजी अध्यक्ष राकेश घोरपडे, प्रफुल्ल पिसे, संदेश भालेकर, गणेश नलावडे, सुनील चाळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.