अनधिकृत कोविड सेंटर चालविणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:31 AM2021-04-16T04:31:47+5:302021-04-16T04:31:47+5:30
खेड : शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोविड केअर सेंटर सुरू करून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणे हा कायद्याने ...
खेड : शासनाची कोणतीही परवानगी न घेता कोविड केअर सेंटर सुरू करून कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने भरणे नाका येथील एसएमएस रुग्णालयाच्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.
खेड तालुक्यातील भरणे नाका येथे असलेल्या एसएमएस या रुग्णालयात अनधिकृत कोविड केअर सेंटर सुरू करून डॉ. परमेश्वर गौंड यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यास सुरुवात केली. या ठिकाणी अनेक कोरोनाबाधित रुग्ण दाखल असून, एक दोन महिलांचा मृत्यूही ओढवला आहे. खरे तर ही गंभीर बाब तालुका प्रशासन, तालुका आरोग्य यंत्रणा आणि भरणे ग्रामपंचायत यांच्या लक्षात यायला हवी होती. मात्र, याकडे प्रशासनाने लक्ष दिले नव्हते की जाणूनबुजून दिले जात नव्हते हा संशोधनाचा विषय आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी हा गंभीर प्रकार उघडकीस आणला. तालुका आरोग्य यंत्रणा आणि तालुका प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. वृत प्रसिद्ध झाल्यावर प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजन शेळके यांनी एसएमएस रुग्णालयात जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
परवानगीशिवाय कोविड केअर सेंटर चालविणे म्हणजे रुग्णांच्या व इतर सामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्यासारखे असल्याने प्रशासनाने तत्काळ हे कोविड केअर सेंटर बंद करून संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करणे गरजेचे होते; परंतु अद्यापही याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हा सारा प्रकार आमदार योगेश कदम यांच्या कानावर जाताच त्यांनी या गंभीर बाबीची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी संपर्क साधत संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमदार योगेश कदम याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे समजते.