शिक्षण विभागातून पवित्र पोर्टलची फाईलच गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 02:03 PM2020-10-13T14:03:37+5:302020-10-13T14:09:05+5:30
Education Sector, pavitraportal, teacher, Ratnagiri भाजप सरकारच्या काळात शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेली पवित्र पोर्टलची फाईल शिक्षण विभागातून गायब झाल्याने शिक्षक भरती पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. उमेदवारांमधून मात्र याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
रत्नागिरी : भाजप सरकारच्या काळात शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेली पवित्र पोर्टलची फाईल शिक्षण विभागातून गायब झाल्याने शिक्षक भरती पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे. उमेदवारांमधून मात्र याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
शिक्षकांच्या मेगा भरतीसाठी पवित्र पोर्टल निर्माण करण्यात आले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित शाळांमधील दहा हजार शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलचा अवलंब करण्यात येत होता. या भरतीसाठी निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती. त्यासाठी १६ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शिक्षक भरतीबाबत अनेक तक्रारी पुढे आल्याने भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती. शिक्षक भरती प्रक्रियेत घोळ झाल्याचे व्यवहार झाले असून, काही शिक्षक संघटनांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला पवित्र पोर्टलबाबत माहितीच्या आधारे बाजू मांडायची असताना संबंधित फाईल हरवली असल्याने विभागामध्ये शोधाशोध सुरू आहे. शिक्षण विभागाच्या गलथान प्रकाराबाबत उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
आधीच भरती प्रक्रिया रेंगाळली असतानाच त्यातच फाईल गहाळ झाल्याने भरती आणखी लांबण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. एकूणच शासन शिक्षक भरतीबाबत उदासीन असून, उमेदवारांवर अन्याय करीत आहे.
अनेक रिक्त जागांचा घोळ
मुलाखतीशिवाय भरती करण्यात येणाऱ्या माजी सैनिकांच्या १२०० जागा रिक्त असून, त्याला एक वर्ष उलटले आहे. त्या जागांसह, रिक्त, अपात्र यांच्या एकूण १,४०० जागा येणे अपेक्षित आहेत. संस्थांच्या ३,००० जागांचा राऊंड होणे आहे. शिवाय मागासवर्गीयांच्या अन्यायकारक कपातीच्या जागा भरणे आवश्यक आहे. त्याबाबतही निर्णय घेणे आवश्यक आहे.
वेळकाढू धोरण
प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे संस्थेच्या मुलाखतीसह भरती प्रक्रियेला विलंब झाला आहे. १०:१ या प्रमाणात अभियोग्यताधारक उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १० संस्थांमध्ये मुलाखतीसाठी संधी उपलब्ध होईल. या प्रक्रियेला बराच कालावधी लागेल. त्यामुळे १० वर्षे रखडलेली भरती सुरू होऊन ३ वर्षे झाली तरी प्रक्रिया रडतखडत सुरू आहे.
सुरूवातीला २४,००० पदांची घोषणा नंतर १८,००० पदांची घोषणा मागील सरकाने करून प्रत्यक्षात १०,००० पदांची जाहिरात देण्यात आली. प्रक्रियेला तीन वर्षे उलटून गेली तरी पाच हजार पदांचीच भरती झाली. उर्वरित पदे भरली जावीत, यासाठी दीड लाख उमेदवार वाट पाहात आहेत. आता मुलाखतीसह पदभरतीची फाईलच मंत्रालयातून गहाळ झाल्याने याबाबत तत्काळ कार्यवाही करून प्रक्रिया सुरू झाली नाही तर विद्यार्थी आक्रमक पवित्रा घेतील
- संदीप गराटे,
अध्यक्ष कोकण डीएड बीएड धारक संघटना
मंत्रालयातून शिक्षक भरतीची फाईलच गायब होणे हे संतापजनक आहे. सरकार सुमारे दीड लाख अभियोग्यताधारकांच्या भावनांशी खेळ करत आहे. अनेक उमेदवारांची विहीत वयोमर्यादा उलटत असून, यासाठी जबाबदार सर्वस्वी प्रशासनच आहे. दहा वर्षे नोकरीची वाट पाहणाऱ्या पात्र उमेदवारांच्या सहनशीलतेचा अंत सरकारने पाहू नये. अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.
- भाग्यश्री रेवडेकर,
उपाध्यक्ष- कोकण डीएड बीएड धारक संघटना
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत फाईल गहाळ होणे हे न पटण्यासारखे आहे. पवित्र प्रणालीवर उपलब्ध डेटा मागवून त्वरित प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा प्रशासनाला दीड लाख उमेदवारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. शिक्षक भरतीबाबत शासनाची भूमिका अन्यायकारक आहे. शासनाने भरती प्रक्रियेबाबत सकारात्मक पावले उचलावीत.
- राहुल खरात,
अभियोग्यता धारक