विना ई-पास जिल्ह्यात येणाऱ्या दोन आरामबस चालकांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:51 AM2021-05-05T04:51:06+5:302021-05-05T04:51:06+5:30
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रावर दोन आरामबस विना ई-पास आढळल्या. ...
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या कशेडी घाटात उभारण्यात आलेल्या तपासणी केंद्रावर दोन आरामबस विना ई-पास आढळल्या. याप्रकरणी चौघाजणांविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत मच्छिंद्र गीते (वय २५) हे पोलीस कर्मचारी कशेडी घाटात वाहनांची तपासणी करीत हाेते. या तपासणीदरम्यान चालक स्वप्निल आनंद जाधव (३५, रा. सौंदळ, ता. राजापूर), प्रणय प्रकाश गुजर (२२, मिळंद, ता. राजापूर) हे त्यांच्या ताब्यातील रिया ट्रॅव्हल्स आरामबस (एमएच ०१, सीआर ८६८५) ही मुंबई ते पाचल अशी घेऊन जात हाेते. त्यांची तपासणी केली असता प्रवाशांकडे ई-पास नसताना तसेच प्रवाशांचा पल्सरेट, ऑक्सिजन लेवल शिक्का न मारता विना ई-पास आपले वाहन चालविताना आढळले. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तसेच सुरेखा जाणू वरक या पोलीस कर्मचारी कशेडी नाका येथे नाकाबंदीसाठी तैनात हाेत्या. वाहनांची तपासणी करताना सतीश सुरेश बेळंके (२९, रा. सावडाव, पाचल, ता. राजापूर) व सर्वेश महादेव गोसावी (२०, रा. ताम्हाणे, पाचल, ता. राजापुर) त्यांच्या ताब्यातील विष्णू आरामबस (एचएच ४६, बीएम २६८९) मुंबई ते पाचल अशी घेऊन जात हाेते. त्यांच्याकडेही प्रवाशांचे ई-पास नव्हते. तसेच प्रवाशांच्या पल्सरेट, ऑक्सिजन लेव्हल आदी बाबी न तपासता, त्यांच्या हातांवर १४ दिवस होम क्वारंटाईनचा शिक्का न मारता, विना ई-पास ट्रॅव्हल्स आरामबस चालवीत हाेते. त्यांच्याविराेधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.