भरणे पर्यायी मार्गावरील खड्ड्यांमुळे चालकांची कसरतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:23 AM2021-05-29T04:23:54+5:302021-05-29T04:23:54+5:30
खेड : शहरातील भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूकडील ...
खेड : शहरातील भरणे येथे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्गाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूकडील पर्यायी रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. या पर्यायी मार्गावर जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. भुयारी मार्गाच्या कामामुळे आंबवलीच्या दिशेने जाणारा मार्ग बंद झाला आहे. यामुळे आंबवलीच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वळसा मारावा लागत आहे.
भरणे येथील भुयारी मार्गासह चौपदरीकरणातील अंतर्गत कामामुळे दोन्ही बाजूकडून एकेरी मार्गाचा अवलंब सुरू आहे. या मार्गावरून दिवस-रात्र शेकडो वाहने धावत असतात. एकेरी मार्गामुळे वाहनचालकांना प्रसंगी फसगतीलाही सामोरे जावे लागत आहे. ठेकेदार कंपनीने याठिकाणी कुठल्याही प्रकारचा सूचना फलकही लावलेला नाही. यामुळे वाहनचालक आणखीनच बुचकळ्यात पडत आहेत. या ठिकाणच्या एकेरी मार्गामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. याठिकाणी ठेकेदार कंपनीने कर्मचारीही तैनात केलेला नाही. यामुळे दिवसेंदिवस वाहतूक कोंडीची समस्या बिकट बनत चालली आहे. यामध्ये आता जागोजागी पडलेल्या खड्ड्यांचीही भर पडली आहे. यामुळे पर्यायी मार्ग कुचकामी ठरत आहे. या मार्गावरून धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे मार्ग आणखीनच धोकादायक बनला आहे आणि त्यातच या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने हा मार्ग दिवसेंदिवस धोकादायक बनत आहे. त्यामुळे ठेकेदार कंपनीने तत्काळ येथील खड्डे बुजवावेत तसेच मार्गदर्शक फलक लावून वाहनचालकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी वाहनचालकांमधून होत आहे.
----------------------------------
खेड शहरातील भरणे येथील भुयारी मार्गामुळे पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.