स्थलांतरित मुलांसाठी भरते फिरती शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:02+5:302021-04-08T04:31:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : स्थलांतरित मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी रत्नागिरीत चक्क ‘फिरती शाळा’ सुरू करण्यात आली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : स्थलांतरित मुलांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी रत्नागिरीत चक्क ‘फिरती शाळा’ सुरू करण्यात आली आहे. भाट्ये पुलानजीक एका नारळाच्या बागेत ही हंगामी शाळा भरत असून, १५ मुले येथे शिकत आहेत. या मुलांना फिरत्या शाळेत जिल्हा परिषदेच्या विशेष साधन व्यक्ती असलेल्या खालिदा जमादार, मिस्त्री हायस्कूलच्या मुख्याध्यापिका रूकसाना फडनाईक व त्यांची टीम आळीपाळीने अध्यापन करीत आहे.
शासनाच्या १ ते १० मार्चपर्यंत सुरू असलेल्या शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्याच्या मोहिमेंतर्गत जमादार यांनी १५ शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेतले होते. कर्नाटक येथून रोजगारासाठी स्थलांतरित झालेली कुटुंबे भाट्ये पुलाजवळ वास्तव्य करीत आहेत. तेथील काही मुलांना उर्दू शाळेत दाखल करण्यात आले आहे. पहिली ते चौथीच्या वर्गातील ही मुले असून, पालकांशी व मुलांशी संवाद साधून त्यांना अध्यापन करण्यात येत आहे. गटशिक्षणाधिकारी सशाली मोहिते यांनीही येथे भेट देऊन मुलांशी हितगुज साधले.
वस्तीवरील स्थलांतरित मुलांना मिस्त्री प्राथमिक शाळेत दाखल करण्याबाबत मुख्याध्यापिका रूकसाना फडनाईक यांची भेट घेऊन त्यांच्याशी जमादार यांनी चर्चा केली व त्यानंतर पुन्हा पालकांशी चर्चा केली. संबंधित मुलांना त्यांच्या वस्तीत जाऊन शिकविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मिस्त्री प्राथमिक विभागाचे शिक्षक यांनीही अध्यापनासाठी तयारी दर्शविली. आठवड्यातून दोन दिवस शिक्षक तेथे जाऊन अध्यापन करीत आहेत. जमादारही स्वत: जाऊन अध्यापन करीत आहेत.
वस्तीच्या शेजारी केळीची वखार असून वखारीच्या मालकांनी मुलांना तिथे शिकविण्याची परवानगी दिल्याने मुलांना अध्यापनासाठी बसण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. संध्याकाळी नारळाच्या बागेत अध्यापन केले जात असून, एक ‘फिरती शाळा’ सुरू झाली आहे.
.....................
आरटीईनुसार एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळाबाह्य मुलांसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. त्या वेळी स्थलांतरित कुटुंबांतील १५ शाळाबाह्य मुलांना शैक्षणिक प्रवाहात दाखल करून घेण्यात आले. भाट्ये येथे कर्नाटकातून रोजगारासाठी आलेल्या कुटुंबे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधून १ली ते ४थीच्या वर्गातील मुलांना हंगामी स्वरूपात शाळेत दाखल करून फिरत्या शाळेच्या माध्यमातून अध्यापन करण्यात येत आहे. यासाठी डायट परिवार व शिक्षण विभागाचे सहकार्य लाभत आहे.
- खालिदा जमादार, रत्नागिरी