..अखेर आश्वासनानंतर आंबा बागायतदारांचे आमरण उपोषण मागे
By मेहरून नाकाडे | Published: December 16, 2023 06:58 PM2023-12-16T18:58:09+5:302023-12-16T18:58:58+5:30
माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत आंदोलन मागे घेण्याचे केले आवाहन
रत्नागिरी: आंबा,काजू बागायतदरांचे कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या आमरण उपोषणाकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले असले तरी माजी आमदार बाळ माने, जि.प.चे माजी अध्यक्ष उदय बने, माजी सभापती परशुराम कदम यांनी पुढाकर घेत मंत्र्यांच्या माध्यमातून मागण्या मान्य करुन घेवू असे आश्वासन दिले. आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी रामचंद्र मोहिते यांना बाळ माने, उदय बने यांनी सरबत देवून उपोषण थांबविले.
गेल्या सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर आंबा, काजू बागायतदारांचे हे आंदोलन सुरू होते. करबुडे येथील आंबा बागायतदार शेतकरी रामचंद्र मोहिते आमरण उपोषणास बसले होते. इतर बागायतदारांनी आंदोलनास पाठीबा देण्यासाठी साखळी उपोषण सुरू ठेवले होते. उपोषणाच्या माध्यमातून बागायतदारांची रास्त मागणी ऐकून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी येतील अशी अपेक्षा होती. परंतु गेल्या आठवडाभरात आंदोलनकर्त्यां बागायतदारांची बाजू कुणीही ऐकून घेण्यास पुढे सरसावलेले नव्हते.
शनिवारी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधत विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्या माध्यामातून आंबा, काजू बागायतदारांच्या प्रश्न सोमवारी विधानसभेत आवाज उठवला जाईल, तुम्ही आंदोलन मागे घ्या असे आवाहन केल्यानंतरच आंदोलकांचे नेते प्रकाश साळवी यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. यावेळी माजी सभापती परशुराम कदम, बागायतदार संघटनेचे प्रकाश साळवी, तुकाराम घवाळी, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी उपस्थित होते.