अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मुंबईत बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 12:32 PM2019-11-02T12:32:17+5:302019-11-02T12:33:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी परिषद भवनात धडकले. ...

Finally, the CEO was transferred to Mumbai | अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मुंबईत बदली

अखेर मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मुंबईत बदली

googlenewsNext
ठळक मुद्देअविश्वास ठराव आणण्यापूर्वीच बदलीचे आदेश रघुनाथ बामणे यांच्याकडे कार्यभार





लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी परिषद भवनात धडकले. गोयल यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली जिल्हा परिषदेतील सत्ताधारी शिवसेनेकडून सुरु होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल या जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन काम करीत नसल्याचा आरोप होता. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात न घेता गोयल यांनी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केल्या होत्या. या बदल्यांबाबत अध्यक्षा स्वरुपा साळवी यांच्याशी आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना टप्प्याटप्प्याने तसेच मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची दक्षता घेऊन नवीन शिक्षकांची भरती झाल्यानंतरच त्यांना सोडण्यात यावे, अशी चर्चा होऊनही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना सोडले. त्यामुळे येथील शिक्षकांची पदे रिक्त झाल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर अविश्वास ठरावासाठी सभा घेण्यात आली होती. विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहितेचे कारण पुढे करीत जिल्हाधिकाऱ्यांनी सभा घेता येणार नाही, असे आदेश देऊन ती सभा रद्द केली होती. मात्र, हे आदेश पदाधिकारी व सदस्यांपर्यंत पोहोचलेच नव्हते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जोरदार चर्चा झाली होती.

दरम्यान, अविश्वास ठरावावर सभा होणार, हे आमदार व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केले होते. त्याप्रमाणे दि. ५ नोव्हेंबर रोजी अविश्वास ठरावावर सभा बोलावण्यात आली होती. मात्र, तत्पूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांची महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ, मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाल्याचे आदेश शुक्रवारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाले. तरीही अविश्वास ठरावावर चर्चा होणार, हे निश्चित आहे. सध्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार आहे.
 

Web Title: Finally, the CEO was transferred to Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.