अखेर चिपळूणच्या सभापती धनश्री शिंदे यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:32 AM2021-03-18T04:32:08+5:302021-03-18T04:32:08+5:30
चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापती धनश्री शिंदे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षांकडे सुपूर्द ...
चिपळूण : येथील पंचायत समितीच्या सभापती धनश्री शिंदे यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा बुधवारी जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षांकडे सुपूर्द केला. पुढील निवडीपर्यंत उपसभापती पाडुरंग माळी यांच्याकडे प्रभारी सभापतीपदाचा कार्यभार राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सभापती पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चलबिचल सुरू आहे. महाविकास आघाडीत यावेळी सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार आहे. त्यामुळे इच्छुक सदस्यांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काही महिन्यांपूर्वी कापसाळ गणाच्या सदस्य रिया कांबळी यांना सभापतीपदाचा शब्द देण्यात आला होता. तालुक्यात पंचायत समिती सभापतीपदी अद्याप बौद्ध समाजाला संधी मिळालेली नाही. यावेळेस कांबळी यांच्या रूपाने ती संधी द्यावी, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे.
दरम्यान, कोकरे गणाच्या सदस्य समीक्षा घडशी यांनीही सभापतीपदी संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. सुरुवातीला सभापती धनश्री शिंदे यांनाच मुदतवाढ देण्याचा निर्णय झाला होता. राष्ट्रवादीच्या अनेक सदस्यांनी त्याला पाठिंबाही दर्शवला होता. मात्र, इच्छुकांनी उचल खाल्ल्याने ठरलेले गणित बिघडले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठांनी राजीनामा देण्याची सूचना केल्यानंतर सभापती शिंदे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.
महाविकास आघाडीत उपसभापतीपद शिवसेनेकडे जाणार आहे. सेनेतही उपसभापती पदासाठी इच्छुकांची मांदियाळी आहे. एकाच व्यक्तीकडे दोन-दोन पदांचा भार नको, अशी भूमिका सेनेच्या काही सदस्यांनी खासगीत व्यक्त केली आहे. त्यावर शिवसेनेचे स्थानिक नेते कोणती भूमिका घेतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.