शासकीय अधिकाऱ्यांना मारहाणप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अखेर तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:33 AM2021-04-04T04:33:15+5:302021-04-04T04:33:15+5:30
एका शासकीय महामंडळाचे मुंबई येथून कामानिमित्त रत्नागिरीत आलेले अधिकारी २४ रोजी रात्री रत्नागिरीतील आपल्या सहकारी अधिकाऱ्यासह, शहरातील मांडवी ...
एका शासकीय महामंडळाचे मुंबई येथून कामानिमित्त रत्नागिरीत आलेले अधिकारी २४ रोजी रात्री रत्नागिरीतील आपल्या सहकारी अधिकाऱ्यासह, शहरातील मांडवी येथील एका नामांकित हाॅटेलात राहण्याकरिता व भोजनाकरिता गेले होते. सध्या संचारबंदी सुरू असल्याने जेवणाचा विभाग १० वाजता बंद होत आल्याने या अधिकाऱ्यांनी उशीर नको, म्हणून हॉटेलमधील वेटरच्या सांगण्यावरून त्याला आपली शासकीय गाडी पार्क करायला दिली. मात्र, ती पार्क करताना ती तिथल्या भिंतीवर जोरात आदळली. त्यात गाडीचे टायर फुटून इतर मोठे नुकसान झाले.
या अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता त्या वेटरकडे गाडी चालविण्याचा परवाना नसल्याचे त्याने सांगितले. अधिकाऱ्याने वेटरच्या इतर ओळखपत्राची साॅफ्टकॉपी आपल्या मोबाईलवर पाठवण्याकरिता स्वतःचे व्हिसीटींग कार्ड हॉटेलचे मॅनेजर व तो वेटर यांना दिले. दरम्यान, गाडी आदळण्याचा आवाज ऐकून शेजारच्या एका हाॅटेलमधून काही व्यक्ती आत आल्या. यापैकी सुर्वे नामक व्यक्तीने या शासकीय अधिकाऱ्यांपैकी एकाच्या अंगाला हात लावून अरेतुरेच्या भाषेत प्रकरण मिटवण्यास सांगितले. अरे तुरेच्या भाषेत बोलू नका, असे या अधिकाऱ्याने सांगताच, त्या गोष्टीचा राग येऊन सुर्वे व त्यांचे २ मद्यधुंद साथीदार यांनी दोन्ही अधिकाऱ्यांना मारहाणीचा प्रयत्न करून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. हॉटेल कर्मचारी तसेच या हॉटेलात जेवण्यास आलेल्या महिला पाहुण्यांनी या दोन अधिकाऱ्यांची काहीही चूक नसल्याचे सांगून सुर्वे व साथीदार यांना अडविले. अशाप्रकारे पर्यटकांवर हल्ला करून शहराचे नाव बदनाम करत आहात, असेही सुनावले.
संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असूनही या घटनेनंतर तब्बल ७ दिवसानंतर काही माध्यमातून खोट्या बातम्या छापून आणल्या. यात या शासकीय अधिकाऱ्यांची जाणीवपूर्वक बदनामी करून मद्यधुंद असल्याचे व त्यामुळे पोलिसांत तक्रार दाखल न केल्याचे म्हटले होते. मात्र, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल लाड यांनी हे वृत्त धांदात खोटे असल्याचा निर्वाळा दिला असून या शासकीय अधिकाऱ्यांपैकीही कुणीही मद्यपान केले नसल्याचे सांगितले.
गेल्या दीड वर्षांत औद्योगिक क्षेत्रातील अनेक बेकायदेशीर बाबींवर आपण कारवाई केली आहे. त्यामुळे हितसंबंध दुखावलेल्या काही लोकांनी या घटनेचा गैरफायदा घेऊन निराधार, खोट्या बातम्या घटनेच्या ७ दिवसांनंतर छापून आणल्या. आपण कोणतेही गैरवर्तन केलेले नसल्यानेच आमच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल नाही. मात्र,या गैरप्रकाराबाबत आम्ही रितसर अदखलपात्र गुन्ह्याबाबत तक्रार नोंदविल्याचे रत्नागिरीतील प्रादेशिक अधिकारी यांनी सांगितले.