अखेर जिल्हा प्रशासनाचे संचारबंदीबाबतचे आदेश जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:31 AM2021-04-07T04:31:33+5:302021-04-07T04:31:33+5:30
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदीचे आदेश सोमवारी उशिरा जारी केले. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत ...
रत्नागिरी : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी संचारबंदीचे आदेश सोमवारी उशिरा जारी केले. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत संचारबंदीच्या नियमावलीत कुठल्या बाबी सुरू राहणार आणि कुठल्या बाबींना मनाई करण्यात आली आहे, ते स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत, ५ पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक
ठिकाणी एकत्र फिरण्यास अथवा एकत्र जमा होण्यास प्रतिबंध राहील. शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही नागरिकांस वैध कारणाशिवाय फिरण्यास मनाई राहील; मात्र वैद्यकीय आणि इतर अत्यावश्यक सेवा यांना या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे. यात रुग्णालये, रोग निदान केंद्रे, कलिनिक्स, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग, इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा, किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, दूध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, अन्य खाद्य दुकाने यातून सवलत देण्यात आली आहे.
रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा आणि सार्वजनिक बसेस आदी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विविध देशांच्या परराष्ट्र संबंधविषयक कार्यालयांच्या सेवा, स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सूनपूर्व उपक्रम, सेवा, स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा, मालाची - वस्तूंची वाहतूक, कृषीविषयक सेवा, तसेच ऑनलाइन व्यवहार, मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा त्याचबरोबर स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे.