अखेर ताम्हाणे - धनगरवाडी रस्त्यासाठी २ काेटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:34 AM2021-09-25T04:34:14+5:302021-09-25T04:34:14+5:30
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतरही डाेलीचाच आधार घ्यावा लागत असल्याचे सर्वप्रथम ...
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटातील ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थांना स्वातंत्र्यानंतरही डाेलीचाच आधार घ्यावा लागत असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘लाेकमत’ने १९ सप्टेंबर राेजी प्रसिद्ध केले हाेते. या वृत्ताची दखल घेत आमदार राजन साळवी यांनी येथील रस्त्याच्या कामासाठी निधी मिळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला. अखेर या रस्त्याच्या कामासाठी २.४० लाखांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील पाचल जिल्हा परिषद गटामध्ये होणाऱ्या सतत पाणीटंचाईवर ठोस उपाययोजना म्हणून चव्हाणवाडी येथे धरण बांधण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार चव्हाणवाडी लघु पाटबंधारे योजना १९८८ रोजी ताम्हाणे पहिलीवाडी येथे अस्तित्वात आली. १९९५ मध्ये युती शासनाच्या काळामध्ये ९५२.५४ लाख रुपये या योजनेवर प्रस्तावित करण्यात आले. त्यानंतर २००१ साली धरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, भाववाढीमुळे भूसंपादन किमतीतही वाढ झाल्याने काम ठप्प होऊन २००३ साली पुन्हा एकदा २०५०.९९ लाख रुपयांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यानंतर २००६ साली काम सुरू झाले.
धरणालगतच्या आजूबाजूला असलेल्या धनगरवाडी व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीकडे जाणारे रस्ते बाधित क्षेत्रात येत आहेत. आजपर्यंत प्रकल्पावर २०.५४ कोटी रुपये खर्च झाले आहेत. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून ताम्हाणे धनगरवाडी व बाधित क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या उर्वरित जमिनीकडे जाणारे रस्ते यासाठी लागणार निधी उपलब्ध करून मिळावा म्हणून मागणी केली हाेती. त्यानुसार नवीन अंदाजपत्रकात ताम्हाणे धनगरवाडीकडे जाण्याऱ्या रस्त्यासाठी २ कोटी ४० लाख रुपये तरतूद केली आहे. यासाठीचे सुधारित अंदाजपत्रक मंजुरीसाठी प्रशासकीय यंत्रणेकडे आहे.
-------------------
‘लाेकमत’ने वेधले लक्ष
ताम्हाणे - धनगरवाडीतील ग्रामस्थ नाना धाेंडू अर्चिणेकर (६५) यांना उपचारासाठी चार किलाेमीटर चालत डाेलीतून आणण्यात आले. अनेक वर्षे निवडणुकांमध्ये केवळ आश्वासन देण्यात येत हाेती. मात्र, रस्ता हाेत नव्हता. या गाेष्टीकडे ‘लाेकमत’ने लक्ष वेधून ग्रामस्थांची व्यथा मांडली हाेती. या वृत्तानंतर आमदार राजन साळवी यांनी तातडीने याबाबत केलेल्या पत्रव्यवहारांबाबत पाठपुरावा सुरू केला.
--------------
अर्जुना मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या १००८ कोटी रुपये पाचव्या सुधारित अंदाजपत्रकला मंजुरी दिली आहे. त्यानुसारच येणाऱ्या काही काळातच महाविकास आघाडी सरकारकडून सुधारित अंदाजपत्रकानुसार ११८.७३ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात येणार आहे. त्या निधीमधून ताम्हाणे धनगरवाडी रिंग रोडचे काम प्राधान्याने घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.
-राजन साळवी, आमदार