अखेर नाॅन कोविड रुग्णालयांसाठी राखीव कोट्यातून प्राणवायूचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:09+5:302021-05-06T04:33:09+5:30
रत्नागिरी : नॉन कोविड हॉस्पिटल्सना प्राणवायूचा पुरवठा नाकारण्यात येत होता. अखेर याप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ...
रत्नागिरी : नॉन कोविड हॉस्पिटल्सना प्राणवायूचा पुरवठा नाकारण्यात येत होता. अखेर याप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दखल घेतली असून नॉन कोविड हॉस्पिटल्सना प्राणवायूचा पुरवठा राखीव कोट्यातून करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने या रुग्णालयांना तसेच रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सगळीकडे थैमान घातले आहे. आरोग्य यंत्रणा संपूर्ण ताकदीनिशी लढत असताना रुग्णांना वाचविण्यासाठी उपयोगी पडणाऱ्या इंजेक्शन्स व प्राणवायूचा तुटवडा जाणवत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील व शहरातील शासकीय व काही खाजगी रुग्णालये सोडली तर इतर सर्व नॉन कोविड रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोविड रुग्णालय सोडून इतर रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा गेल्या १० दिवसांपासून बंद करण्यात आला होता, त्यामुळे ही इस्पितळे संकटात सापडली होती. नवजात अर्भके, प्रसूतीसाठी आलेल्या महिला, दमा व हृदयविकाराचे रुग्ण, अपघातातील गंभीर जखमी झालेले व विविध कारणास्तव अतिदक्षता विभागात दाखल असणारे अशा अनेक रुग्णांच्या उपचारासाठी खूप मर्यादा पडत होत्या.
खासगी रुग्णालयात विविध कारणास्तव दाखल होणारे रुग्ण त्यांना जीवदान देणारी नाॅन कोविड रुग्णालये आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यासमोर मोठेच संकट उभे होते. अखेर इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रत्नागिरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांना आवेदन दिले. याबाबत साेमवारी लोकमतनेही वृत्त प्रसिद्ध केले होते. सोमवारी मंत्री सामंत यांनी घेतलेल्या ‘झूम’ पत्रकार परिषदेत पत्रकारांनी नाॅन कोविड हाॅस्पिटल्स आणि रुग्णवाहिकांना नाकारण्यात आलेल्या प्राणवायू पुरवठ्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी सामंत यांनी आपण याबाबत दखल घेतली असून जिल्हाधिकारी यांना सूचना देऊ असे सांगितले.
रत्नागिरी शहर काँग्रेसचे अध्यक्ष राकेश चव्हाण यांनीही मंत्री सामंत व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. मंगळवारी रमेश कीर यांनी सामंत यांच्याशी संपर्क साधून हा विषय मांडला. अखेर मंत्री सामंत, रमेश कीर, जिल्हाधिकारी मिश्रा, अतिरिक्त जिल्हाधिकारी व इंडियन मेडिकल असोसिएशनचे कोविड समन्वयक डॉ. निनाद नाफडे यांच्या उपस्थितील झूम मीटिंग झाली. यावेळी सामंत यांनी अचानकपणे उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीच्या योग्य नियंत्रणासाठी सूचना दिल्या असून सर्व नॉन कोविड हॉस्पिटल्सना प्राणवायूचा पुरवठा राखीव कोट्यातून करण्यात येईल व त्याअभावी रुग्ण किंवा डॉक्टरांना त्रास सहन करावा लागणार नाही, असे आश्वासन देत संबंधित अधिकाऱ्यांना तसेच आदेश दिले आहेत. त्यामुळे या रुग्णालयांमधील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.