अखेर पोसरे गाव कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:30+5:302021-07-16T04:22:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील पोसरे येथे कोरोनाबाधित रूग्णांची सर्वाेच्च संख्या नोंदविण्यात आली होती. गावातील बहुतांशी कुटुंबांची कोरोना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील पोसरे येथे कोरोनाबाधित रूग्णांची सर्वाेच्च संख्या नोंदविण्यात आली होती. गावातील बहुतांशी कुटुंबांची कोरोना चाचणी झाल्यानंतर ८८ बाधित रूग्ण आढळले होते. याची ग्राम कृती दल व आरोग्य विभागाने वेळीच दखल घेतल्याने एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही. ग्रामस्थांनी नियम पाळल्याने पोसरे गाव कोरोनामुक्त होण्यास मदत झाली आहे.
तालुक्यातील पोसरे येथे गेल्या महिन्यात सुरुवातीला तीन-चार रूग्ण बाधित आढळल्यानंतर संपूर्ण गावाची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय ग्राम कृती दलाने घेतला होता. मात्र, चाचणी केल्यानंतर बाधित रूग्णांची संख्या हळूहळू वाढत गेली. एका आठवड्याच्या कालावधीत गावात ८८ बाधित रूग्ण आढळल्याने पोसरे परिसरात खळबळ उडाली होती. तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योती यादव आदींनी गावाला भेट देऊन मार्गदर्शन केले. शेतीची कामे सुरू असतानाच कोरोना चाचणी आणि त्यातून बाधित रूग्ण सापडत असल्याने कठीण समस्या निर्माण झाली होती.
पोसरेचे सरपंच महेश आदावडे, माजी सरपंच विनय सुर्वे, ग्रामसेवक म्हादे, उद्योजक नासीर खोत यांच्यासह आरोग्यसेविका, तलाठी, आशा सेविका तसेच कापरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गाव कोरोनामुक्त करण्यात योगदान दिले. बाधित रूग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे होण्यासाठी ग्राम कृती दलाने बैठक घेतली. जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्ष सुरू केला. त्यानुसार बाधित रूग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे ठरले. यातून कोणत्या रूग्णाला किती प्रमाणात बाधा झाली आहे, रूग्ण धोकादायक स्थितीत आहे का, याची माहिती मिळण्यास मदत झाली. गावस्तरावरच ही चाचणी करण्यात आली. यानंतर सर्वांनीच खबरदारी घेतल्याने गावात एकाही रूग्णाची मृत्यू झाला नाही.
-----------------------------
ग्राम कृती दल सतर्क
गेल्या दोन, तीन महिन्यांच्या कालावधीत मांडकी, तनाळी, मार्गताम्हाणे, खेर्डी, सावर्डे आदी गावांमध्ये बाधित रूग्णांची संख्या वाढली होती. या गावांमध्ये कोरोनामुळे काही रूग्णांचे मृत्यूही झाले होते. दरम्यान, पोसरे येथे बाधित रूग्णांचा विस्फोट झाल्यानंतर आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने त्याची दखल घेतली होती. पहिल्यांदा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यातच ग्राम कृती दलाने खबरदारी बाळगल्याने गाव कोरोनामुक्त होण्यास मदत झाली.
--------------------------
अनेकांचा मदतीचा हात
पोसरे गावात बाधित रूग्णांचा उद्रेक झाल्यानंतर एकता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष आदवडे, सल्लागार ॲड. विजय हुंबरे यांच्यासह सदस्यांनी बाधितांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. या मदतीतून रूग्णांना मोफत औषधांचा पुरवठा करण्यात आला. त्याचबरोबर खाडीपट्ट्यातील पदाधिकाऱ्यांनी मदतीचा हात दिल्याने रूग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्यास मदत झाली.
150721\img-20210715-wa0007.jpg
अखेर पोसरे गाव कोरोनामुक्त