हाॅटेल व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:31 AM2021-04-17T04:31:14+5:302021-04-17T04:31:14+5:30
रत्नागिरी : गतवर्षी सुमारे दहा महिने बंद असलेल्या हाॅटेल, रेस्टाॅरंट चालकांचे व्यवसाय गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरळीत होत असतानाच आता ...
रत्नागिरी : गतवर्षी सुमारे दहा महिने बंद असलेल्या हाॅटेल, रेस्टाॅरंट चालकांचे व्यवसाय गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरळीत होत असतानाच आता पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा हे व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांसमोर मोठेच आर्थिक संकट उभे राहिले आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागताच देशभरातच कडक लाॅकडाऊन सुरू झाले. २३ मार्चपासून सुरू झालेले लाॅकडाऊन अगदी जून महिन्यापर्यंत कडक केले गेल्याने कुठलाच उद्योग किंवा व्यवसाय सुरू नव्हता. केवळ भाजीपाला. किराणा, औषधे, आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योग, व्यवसाय बंद होते. मात्र, जून महिन्यात लाॅकडाऊन थोडेसे शिथिल झाल्यानंतर काही अटी आणि शर्तींवर मोठमोठे उद्योग सुरू झाले. मात्र, हाॅटेल्स, रेस्टाॅरंट बंदच होते. हाॅटेल्स बंद राहिली तरी त्यात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची, जेवणाची साेय करून त्यांना वेतनही द्यावे लागत होते. त्यानंतर अनलाॅक प्रक्रियेत सर्वच उद्योग हळूहळू सुरू झाले. मात्र, हाॅटेल्स, रेस्टारंट यांना केवळ घरपोच पार्सल सेवेची परवानगी देण्यात आली.
ऑक्टोबरमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ५० टक्के ग्राहकांची मर्यादा ठेवत, कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्याच्या अटीवर हाॅटेल्स आणि रेस्टारंट यांना परवानगी मिळाली. त्यानंतर आता पुन्हा जेमतेम चार पाच महिन्यांनंतर हा व्यवसाय नियमित सुरू होत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. १ मेपर्यंत सर्वच व्यवसाय, उद्योग बंद आहेत. त्यामुळे आता पुन्हा हाॅटेल व्यवसायाला याचा फटका बसला आहे.
सध्या पंधरा दिवस लाॅकडाऊन केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या काळात हाॅटेलचालकांना फक्त पार्सल आणि घरपोच सेवा देता येणार आहे. सध्या नागरिक घरात राहणार असल्याने पार्सल नेण्यासाठी येणार कोण, हा प्रश्न आहेच. तसेच घरपोच सेवेलाही म्हणावा तसा प्रतिसाद नाही. त्यामुळे मिळेल त्या उत्पन्नावर सध्या बसून असलेल्या कर्मचाऱ्यांचा सर्व खर्च, तसेच त्यांचे वेतन, हाॅटेलचा खर्च, बँकांच्या कर्जांचे हप्ते आणि अन्य खर्च कसा करायचा, ही चिंता या व्यावसायिकांना सतावत आहे. गेले वर्षभर हाॅटेल चालक ग्राहकांची पाठ फिरली तरी इतर सर्व खर्च अशा दुहेरी आर्थिक संकटात अडकले आहेत.
कोट
जिल्हा प्रशासनाने हाॅटेलचालकांना केवळ पार्सल आणि घरपोच सेवा यासाठीच परवानगी दिली आहे. मात्र, सध्या ग्राहक घरातच आहेत. परंतु घरपोच सेवेलाही फारसा प्रतिसाद नाही. त्यामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
सुनीलकुमार देसाई, अध्यक्ष, रत्नागिरी जिल्हा हाॅटेल व्यावसायिक संघटना