महाआरोग्य मेळाव्यामुळे सर्वसामान्यांचा आर्थिक भार हलका : पालकमंत्री उदय सामंत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2023 12:55 PM2023-02-10T12:55:58+5:302023-02-10T12:56:38+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा
रत्नागिरी : मेळाव्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना होणार असून सर्वसामान्यांचा आजारपणामुळे होणारा आर्थिक भार थोडासा हलका करण्याच्या दृष्टीने महाआरोग्य मेळावा महत्वाचा ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रतिपादन केले. या महाआरोग्य मेळाव्याचा शुभारंभ मंत्री सामंत यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे केले. त्यावेळी ते बोलत होते. शहरातील दामले विद्यालय येथे हे महाशिबिर आयोजित केले होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस राज्यात आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्याचे औचित्य साधून रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथील दामले विद्यालयात गुरुवारी महाआरोग्य मेळावा आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये तसेच संबंधित विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
राज्यात हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ५०० मोफत दवाखाने सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून जनतेला मोफत आरोग्य सुविधा मिळणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. या महामेळाव्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजाविणाऱ्या आरोग्य यंत्रणा व प्रशासन यांना यावेळी पालकमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले की, अत्यंत कमी कालावधीमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालय व प्रशासनाने हा मेळावा उत्तम पद्धतीने आयोजित केला आहे. या शिबिरामध्ये सहभागी डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांनी कौतुक केले. या मेळाव्यामध्ये तज्ञ डॉक्टर्स तपासणी करणार असून नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिरात अवयवदान, देहदान, नेत्रदान नोंदणी कक्ष, रक्तदान शिबिर, आभा कार्ड व आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड नोंदणी, नेत्रतपासणी, कान, नाक, घसा तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी, इसीजी व कार्डिओलॉजिस्टकडून तपासणी व जिल्हा रुग्णालयात आवश्यकतेनुसार २-डी इको तपासणी, जनरल सर्जरी, स्त्री रोग तज्ज्ञांकडून तपासणी, त्वचारोग व कुष्ठरोग निदान, अस्थिरोगतज्ज्ञ तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, बालरोग तज्ज्ञ व बालरोग सर्जनकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, मेंदूविकार तज्ज्ञांकडून तपासणी व गरजेनुसार शस्त्रक्रिया, आयूष विभाग, असंसर्गजन्य रोग तपासणी, समुपदेशन व उपचार, एड्स कंट्रोल सोसायटी, दंतचिकित्सा व उपचार, मानसोपचारतज्ज्ञ तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
पालकमंत्री उदय सामंत यांनी महाआरोग्य मेळाव्याची प्रत्यक्ष पाहणी केली. महाआरोग्य मेळाव्यामधील उपचार करणारे डॉक्टर्स व उपस्थित नागरिक यांच्याशी संवाद साधला व माहिती घेतली.