पाण्याचा निचरा हाेण्याकरिता पर्यायी मार्ग काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:22 AM2021-06-20T04:22:09+5:302021-06-20T04:22:09+5:30
देवरुख : देवरुख शहरातील खालची आळी येथील सारण बंद केल्याने गेले आठ दिवस मार्गावर पाणी साठले होते. यामुळे ही ...
देवरुख : देवरुख शहरातील खालची आळी येथील सारण बंद केल्याने गेले आठ दिवस मार्गावर पाणी साठले होते. यामुळे ही समस्या बिकट बनली होती. या प्रकाराची दखल घेऊन आमदार शेखर निकम यांनी शनिवारी या मार्गाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांना त्वरित तहसीलदारांसोबत चर्चा करून पाण्याचा निचरा होण्याकरिता पर्यायी मार्ग काढावा, असे आदेश दिले.
पावसाचे पाणी वाहून नेणारी सारण पूर्ण बंद झाल्याने मच्छी मार्केटकडे जाणारा मार्ग अडीच ते तीन फूट पाण्याखाली गेला आहे. यामुळे येथील २५ कुटुंबांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे दूषित पाणी आजूबाजूच्या विहिरींमध्ये जात आहे. ही न्यायालयीन बाब असल्याने नगर पंचायत हतबल झाली आहे. यामुळे येथील साचलेल्या पाण्याचा प्रश्न जटील झाला आहे. गेले आठ दिवस या मार्गावर वाहन चालवणे व पायी जाणेही अडचणीचे झाले आहे. तहसीलदारांना येथील नागरिकांनी निवेदनही दिले होते. त्यावर तहसीलदारांनी ही न्यायप्रविष्ट बाब असल्याने निवेदनावर कार्यवाही करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते.
आमदार शेखर निकम यांनी तहसीलदार सुहास थोरात यांच्याशी संपर्क साधून साठलेल्या पाण्याचा प्रश्न सोडवा, अशा सूचना केल्या. तसेच नगर पंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याशी चर्चा करुन पाणी जाण्यासाठी तहसीलदारांबरोबर चर्चा करा तसेच पर्यायी मार्ग काढण्याचे आदेश यावेळी दिले. यावेळी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक राजेंद्र सुर्वे, बाळू ढवळे, नीलेश भुवड, मोहन वनकर, राजू आमडेकर, पंकज पुसाळकर, हनिफ हरचिरकर आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
------------------
येत्या दोन दिवसात साठलेल्या पाण्याचा प्रश्न न सुटल्यास रत्नागिरीला येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची संबंधित २५ कुटुंबे भेट घेणार आहेत. यामुळे साठलेल्या पाण्याचा प्रश्न थेट राज्य शासनाच्या न्यायालयात पोहोचणार आहे.
-------------------------------
देवरूख शहरातील खालची आळी येथील पाण्याच्या समस्येबाबत आमदार शेखर निकम यांनी मुख्याधिकारी बालाजी लोंढे यांच्याशी चर्चा केली.