रखडलेल्या वीज जोडण्या अखेर मिळाल्या

By admin | Published: May 20, 2016 10:21 PM2016-05-20T22:21:35+5:302016-05-20T22:48:14+5:30

महावितरण कंपनी : पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धरले होते धारेवर!--लोकमतचा प्रभाव

Finished power connections were finally received | रखडलेल्या वीज जोडण्या अखेर मिळाल्या

रखडलेल्या वीज जोडण्या अखेर मिळाल्या

Next

रत्नागिरी : ग्राहकांना नवीन विद्युत जोडणी घेताना त्यासाठी लागणाऱ्या एच. टी., एल. टी. रोहित्रासाठी लागणारा खर्च जिल्हा वार्षिक योजनेतून उपलब्ध होऊनही निविदा प्रक्रिया रखडवल्याप्रकरणीचे वृत्त ‘लोकमत’ ने प्रसिध्द केले होते. पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी दौऱ्यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. त्याची दखल घेत रखडलेल्या जोडण्या देण्यास महावितरणने प्रारंभ केला आहे. नवीन जोडण्या मिळालेल्या ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतून ग्राहकांना नवीन जोडणी घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उच्च दाबाची, लघु दाबाची विद्युत वाहिनी, रोहित्र उभारणीसाठी लागणारा खर्च देण्यात येतो. या योजनेंतर्गत २०१४ - १५मध्ये जिल्ह्यातील ६०, तर २०१५ - १६मध्ये ४०४ ग्राहकांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून २ कोटी रुपयांचा निधी यावर्षीसाठी मंजूर झाला होता. गतवर्षीसाठी १ कोटीच्या निधीस मान्यता मिळाली होती. जिल्हा प्रशासनाकडे आॅक्टोबर २०१५मध्ये निधी प्राप्त झाला होता.
लाभार्थींची यादी निश्चित करून वीज जोडणी देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. परंतु त्यासाठी महावितरणकडून ठेकेदार उपलब्ध होत नसल्याचे कारण देत दिरंगाई करण्यात आली. दोन वर्षांपूर्वी ग्राहकांनी प्रस्ताव सादर करून त्यासाठी लागणारे शुल्क भरूनसुध्दा जोडण्या देण्यास विलंब झाला. एप्रिल संपत आला तरी अद्याप महावितरणने निविदा न काढल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. शिवाय ऊर्जामंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून विभागाच्या कारभाराबाबत माहिती दिली.
दरम्यान या प्रकरणात अखेर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी लक्ष घातले आणि महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला असून महावितरणकडून तातडीने नवीन जोडण्या देण्यास प्रारंभ झाला आहे. काही ग्राहकांना जोडण्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित ग्राहकांना लवकरच जोडण्या प्राप्त होणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Finished power connections were finally received

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.