एस्टी वर्कशॉपमधील आगीत भंगार जळून खाक २५ हजारांचे नुकसान : आगीच्या संदर्भात संशयाचे धूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 09:18 PM2018-02-02T21:18:48+5:302018-02-02T21:20:00+5:30
रत्नागिरी : शहरालगतच्या टीआरपी परिसरातील राज्य मार्ग परिवहन महामंळाच्या विभागीय कार्यशाळा परिसरात शुक्रवारी दुपारी दीड वाजता लागलेल्या आगीत भंगारातील कुशन, सीट कव्हर जळून खाक झाल्या. दीड वाजण्याच्या सुमारास लागलेली आग सायंकाळी साडेपाचनंतर आटोक्यात आली. परिसरात धुराचे साम्राज्य परसरले होते.
विभागीय कार्यशाळेत एस. टी.च्या गाड्यांची दुरूस्ती केली जाते. वापरात न येणारे साहित्य याच परिसरात ठेवून नंतर ते भंगारात विकले जाते. दरवर्षी या भंगाराचा लिलाव करण्यात येतो. या भंगाराचा शुक्रवारी लिलाव होणार होता. सुमारे दहा ते पंधरा लाखाचे भंगार साहित्य लिलावासाठी काढण्यात आले होते. हा लिलाव आॅनलाईन सुरू होता. आॅनलाईन लिलाव प्रक्रिया सुरू असतानाच दुपारी दीडच्या सुमारास कार्यशाळेच्या बाहेरील गवताला आग लागली.
वाळलेले गवत पेटत पेटत ती आग भंगारापर्यंत पोहोचली. एस. टी.च्या जुन्या सीटचे कव्हर, कुशन पेटले. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. याशिवाय एस. टी.च्या पार्टस्मधील अॅल्युमिनियमही आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मात्र, अल्युमिनियम वितळवून त्याचा वापर केला जात असल्यामुळे अल्युमिनियमचा लिलाव केला जाणार आहे. आगीचे वृत्त समजताच नगरपालिकेचे बंब मागवण्यात आले. पालिकेच्या चार बंबाव्दारे आग आटोक्यात आणण्याचे काम सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू होते. बंब आॅपरेट करणाºया नगरपालिका कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने कार्यशाळेतील कर्मचारी आग विझवण्याच्या कामात सक्रिय झाले होते. कुशन व सीट कव्हर पेटल्यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते.
अनघा बारटक्के : अॅल्युमिनियमचे पत्रे वितळल्याची माहिती
राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यशाळेत कुशन कव्हर, सीटस्मुळे ही आग अधिकच भडकली होती.दुपारी लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. तब्बल साडेचार तासाने ही आग आटोक्यात आली.
चार बंबाकडून आगीवर नियंत्रण
एसटीचे खराब सीट्स, कुशन कव्हर, पत्रे, तसेच प्लास्टिकचे बॅरेल, अॅल्युमिनिअम असल्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात भडकली. अग्निशमन दलाचे चार बंब आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र या आगीत २५ हजाराचे नुकसान झाल्याची माहिती विभायनियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. अॅल्युमिनियमचे पत्रे वितळलेले असले तरी ते वापरात येणार असल्याचे सांगितले.