फायर ऑडिट म्हणजे ठाकरे सरकारचा वेळकाढूपणा : नीलेश राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:39 AM2021-04-30T04:39:31+5:302021-04-30T04:39:31+5:30
रत्नागिरी : खेड तालुक्यात चार महिन्यांच्या कालावधीमध्ये लोटे एमआयडीसीमध्ये स्फोटांच्या सहा घटना घडल्या. यामध्ये अनेक कामगारांचा बळी जाऊनही सरकारची ...
रत्नागिरी : खेड तालुक्यात चार महिन्यांच्या कालावधीमध्ये लोटे एमआयडीसीमध्ये स्फोटांच्या सहा घटना घडल्या. यामध्ये अनेक कामगारांचा बळी जाऊनही सरकारची मदत पोहोचली नाही. फायर ऑडिट करणार, असे सांगून वेळ मारून नेली जात असल्याचा आराेप महाराष्ट्र प्रदेश सचिव, माजी खासदार नीलेश राणे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, एवढे स्फोट होऊनसुद्धा शिवसेनेचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी लोटे एमआयडीसीमध्ये होणाऱ्या स्फोटांकडे दुर्लक्ष केले आहे. लोटे एमआयडीसीमध्ये २५० हून अधिक कंपन्या आहेत. त्यातील काही कंपन्यांना क्लोजरच्या नोटीस देण्यात आल्या होत्या. त्या कंपन्या बंद करण्याचा आदेश असतानाही तेथील स्थानिक शिवसेनेचे लोकप्रतिनिधी सेटिंग करण्यात व्यस्त आहेत. अशा सेटिंगमुळे कंपन्यांमध्ये आगीच्या घटना घडत आहेत, असा आराेप नीलेश राणे यांनी केला आहे. तर काही कंपन्यांमध्ये जुनी साधनसामगी आहे. त्याआधारेच ते उत्पन्न घेत आहेत. कामगारांना कुठल्याही प्रकारची नवी साधनसामग्री पुरवली जात नाही. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी कंपन्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. मात्र, अद्यापही ऑडिट केले गेलेले नाही. ऑडिटचा प्रश्न अद्यापही जैसे थे आहे, असे राणे यांनी म्हटले आहे.
आग लागूनही प्रशासन आणि सेनेच्या लोकप्रतिनिधींच्या सेटिंगमुळे लोटे एमआयडीसीत होणाऱ्या स्फोटाच्या घटना दडपल्या जात आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे. कंपनी व्यवस्थापक, प्रशासन, शिवसेनेचे लोकप्रतिनिधी यांच्या हलगर्जीपणामुळेच त्या आगीत निष्पाप कामगारांचा बळी जात आहे. बेजबाबदारपणामुळेच कंपनी व्यवस्थापक अजून किती कामगारांचा बळी घेणार? तिथले आमदार आग लागली की फक्त फोटोबाजी करण्यासाठी पुढे-पुढे येतात आणि फायर ऑडिट करू, असे बोलबच्चन करून निघून जातात, असेही नीलेश राणे यांनी म्हटले आहे.