काेल्हापूर-रत्नागिरी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने ५५ प्रवासी सुखरुप बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 11:46 AM2024-01-30T11:46:10+5:302024-01-30T12:18:45+5:30
रत्नागिरी : कोल्हापूर- रत्नागिरी एसटी बसमधील चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारी अचानक धूर आला. शाॅर्टसर्किटमुळे येथील रेक्झिन वितळल्याने अचानक पेट ...
रत्नागिरी : कोल्हापूर-रत्नागिरी एसटी बसमधील चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारी अचानक धूर आला. शाॅर्टसर्किटमुळे येथील रेक्झिन वितळल्याने अचानक पेट घेतला. मात्र, चालक व वाहकांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला.हा प्रकार रत्नागिरी शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथे काल, साेमवारी दुपारी घडला.
काेल्हापूर-रत्नागिरी (एमएच १४, बीटी ४९४५) ही गाडी साेमवारी सकाळी ११ वाजता काेल्हापूर बसस्थानकातून सुटली. या गाडीतून ५५ प्रवासी प्रवास करत हाेते. ही गाडी दुपारी रत्नागिरी शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथे आली असता बसमधून अचानक धूर येऊ लागला. चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारील रेक्झिन वितळून ते इंजिनला चिकटले आणि पेटले. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविली.
त्यानंतर आपत्कालीन खिडकीतून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. काही वेळाने धूर थांबल्याची खात्री केल्यावर चालकाने बस सुरू केली. त्यानंतर ही गाडी प्रवाशांसह सुखरूप रत्नागिरी आगारात आणण्यात आली. चालकाच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.