खेर्डीतील थ्री एम पेपर मिलच्या टाकाऊ मालाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:28 AM2021-04-19T04:28:08+5:302021-04-19T04:28:08+5:30
चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिलमधील टाकाऊ मालाला रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या ...
चिपळूण : शहरानजीकच्या खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिलमधील टाकाऊ मालाला रविवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीच्या धुराचे लोळ इतके मोठे होते की, स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. या आगीची घटना समजताच अग्निशमन बंब दाखल झाला आणि दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून लोटे औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. सुरुवातीला सुप्रिया केमिकल्स नंतर घरडा तर रविवारी समर्थ केमिकल्स कंपनीत आग लागण्याची घटना घडली. समर्थ कंपनीतील आग विझते न विझते तोच खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील थ्री एम पेपर मिलमधील टाकाऊ मालाला अचानक आग लागली. ही घटना उघडकीस येताच चिपळूण नगर परिषद व खेर्डी औद्योगिक वसाहतीमधील अग्निशमन बंबांनी घटनास्थळी येत ही आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, दोन तासांहून अधिक वेळ झाला तरीही आग विझली नव्हती.
या आगीची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, युवक काँग्रेस क्षेत्राध्यक्ष महेश कदम, चिपळूण तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रुपेश आवले, युवा नेते विनोद भुरण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष फैसल पिलपिले, दत्तात्रय कदम, अमित दाभोळकर, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, नितीन काळे, राकेश दाभोळकर, अरविंद दाते, प्रकाश खताते, सौरभ कदम, वैभव भोसले, बापू देसाई, उमेश खताते, नगरपालिकेचे कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती.
...............................
यापूर्वीही घडली होती आगीची घटना
या कंपनीच्या टाकाऊ मालाला आग लागण्याची घटना यापूर्वीही घडली होती. तरीही कंपनी व्यवस्थापनाने कोणतीही काळजी न घेतल्याचे रविवारच्या घटनेवरून समोर आले आहे. अनेकदा वाशिष्ठी नदीपात्रात सांडपाणी सोडले जाते तर टाकाऊ मालाला आग लागण्याच्या घटनाही वारंवार घडत असल्याने कंपनी व्यवस्थापनाने यावर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांमधून केली जात आहे.