राजीवडा येथे फर्स्ट एड शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:14 AM2021-05-04T04:14:10+5:302021-05-04T04:14:10+5:30
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर ...
रत्नागिरी : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटीने जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत फर्स्ट एड शिबिराचे आयोजन केले होते.
शहरातील राजीवडा गावात अजूनही कोरोनाने शिरकाव केलेला नाही़. सुमारे २० हजार लोकवस्ती असलेला हा गाव कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये कोरोनापासून दूरच राहिला आहे. राजीवडा कोअर कमिटीचे पदाधिकारी या गावाला कोरोना मुक्त ठेवण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत आहेत. हा गाव पोलीस अधीक्षक गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दत्तक घेतला आहे.
राजीवडा कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक उपचारांबाबत माहिती मिळावी, यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते़. त्यासाठी डॉ. अशफाक काझी यांनी प्राथमिक उपचारांबाबत मार्गदर्शन करतानाच उपस्थितांना काही उपकरणांची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक गर्ग यांनी राजीवडा कोअर कमिटीच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच कौतुकही केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड, नगरसेवक सुहेल मुकादम, कोअर कमिटी अध्यक्ष नजीर वाडकर, उपाध्यक्ष शब्बीर भाटकर, महंमद सईद फणसोपकर, सचिव शफी वस्ता व पदाधिकारी उपस्थित होते.
.........................................
मोहल्ला क्लिनिकची तयारी सुरू
राजीवडा गाव कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी जमातुल मुस्लिमीन राजीवडा कोअर कमिटीने प्राथमिक स्तरावर नियोजन केले आहे. गावात जनजागृती करण्यात येत असतानाच मोहल्ला क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे़. त्यासाठी राजीवडा येथील नगरपरिषदेच्या उर्दू शाळेमध्ये दोन वर्गखोल्या घेण्यात आल्या असून, त्यामध्ये मोहल्ला क्लिनिकचे काम सुरू करण्यात आले आहे.
...........................................
राजीवडा कोअर कमिटीने आयोजित केलेल्या फर्स्ट एड शिबिरामध्ये पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश लाड, नगरसेवक सुहेल मुकादम, डॉ. अशफाक काझी, नजीर वाडकर उपस्थित हाेते.