रत्नागिरी केंद्रातून कॅप्टन-कॅप्टन नाटक प्रथम, सिंधुदुर्गचे निखारे द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 04:00 PM2017-11-30T16:00:10+5:302017-11-30T16:06:32+5:30
सत्तावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम तर वेंगुर्लेच्या कलावलय संस्थेचे निखारे नाटकाने दुसरा क्रमांक मिळाला आहे.
रत्नागिरी : सत्तावन्नव्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत रत्नागिरी केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालयाच्या कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम क्रमांकासह अन्य चार वैयक्तिक बक्षिसे मिळवली आहेत.
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहात दिनांक ६ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत पार पडली होती. या स्पर्धेत एकूण १५ नाट्यप्रवेश सादर करण्यात आले होते.
या स्पर्धेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. त्यात कॅप्टन कॅप्टन या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवला. वेंगुर्लेच्या कलावलय संस्थेचे निखारे हे नाटक दुसरे तर सिंधुदुर्गच्या साई कला क्रीडा मंडळाच्या अशुद्ध बिजापोटी या नाटकाला तिसरा क्रमांक मिळाला आहे.
त्याशिवाय उत्कृष्ट दिग्दर्शक (मनोहर सुर्वे), उत्कृष्ट नेपथ्य (प्रवीण धुमक), प्रकाश योजना (संजय तोडणकर) यांनाही पारितोषिके मिळाली. या नाटकातील प्रमुख भूमिकेतील कलाकार ओंकार पाटील याला अभिनयाचे रौप्यपदक मिळाले आहे.
दिग्दर्शनाचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस संजीव पुनाळेकर (नाटक - निखारे), प्रकाश योजनेचे द्वितीय पारितोषिक स्वानंद सामंत (नाटक - निखारे), नेपथ्य द्वितीय पारितोषिक सचिन गोताड (नाटक - ती रात्र), रंगभूषा प्रथम पारितोषिक रजनीकांत कदम (नाटक - अशुद्ध बीजापोटी), द्वितीय पारितोषिक किशोर कदम (नाटक - भावीण), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सानिका कुंटे (नाटक - अशुद्ध बीजापोटी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अंकिता नाईक (नाटक - भावीण), रूपाली परब (नाटक - बिकट वाट वहिवाट), पल्लवी माळवदे (नाटक - भावीण), सुलेखा डुबळे (नाटक - अशुद्ध बीजापोटी), प्रसाद खानोलकर (नाटक - निखारे), केदार देसाई (नाटक - अशुद्ध बीजापोटी), रवींद्र रेपाळ (नाटक - कोर्ट मार्शल), महेश पाखरे (नाटक - कुणीतरी आहे तिथं)