आपला शत्रू कोण आहे ते आधी निश्चित करा, मंत्री उदय सामंत यांचे समन्वय समितीच्या बैठकीत आवाहन
By मनोज मुळ्ये | Published: January 11, 2024 02:59 PM2024-01-11T14:59:42+5:302024-01-11T15:00:00+5:30
नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत
रत्नागिरी : अनेकदा आपण आपापसातच भांडत बसतो. मात्र जर आपल्याला नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे असेल तर आपल्यातील वाद मिटवले पाहिजेत. त्यासाठी आपला नेमका शत्रू कोण आहे, हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे, असे सूचक उद्गार राज्याचे उद्योग मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले.
शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) अशा महायुतीमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक गुरुवारी रत्नागिरीमध्ये झाली. या बैठकीत मंत्री उदय सामंत यांनी सर्वांना एकत्र पुढे जाण्याचे आवाहन केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पुन्हा पंतप्रधान पदावर पाहण्यासाठी सर्वजण धडपडत आहेत. त्यासाठीच मिशन ४८ ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. जर सर्वांचा उद्देश एकच आहे तर सर्वांनी एकत्र राहूनच काम करायला हवे, असे ते म्हणाले. आपापसात काही मतेमतांतरे असतील तरी आपापल्या पक्षाच्या समन्वयकामार्फत त्यावर तोडगा काढायला हवा. महायुती ही केवळ लोकसभेसाठी नाही. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद गटापासून लोकसभेपर्यंत प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वजण एकत्र राहिलो तर प्रत्येक ठिकाणी विजय फक्त आपलाच होईल. विरोधक नावालाही शिल्लक राहणार नाहीत, असेही ते म्हणाले.
या बैठकीमध्ये भाजपाकडून समन्वयक म्हणून प्रमोद जठार, शिवसेनेकडून समन्वयक म्हणून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून समन्वयक म्हणून आमदार शेखर निकम उपस्थित होते. तीनही पक्षांचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महायुती राज्यस्तरावर आहे. मात्र ग्रामीण पातळीवर अजूनही समन्वय झालेला नाही, यासह अनेक मुद्दे महायुतीतील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मांडले. ग्रामपातळीवरही समन्वय तयार व्हायला हवा, यासाठी जिल्हा समन्वय समिती आणि तालुका पातळीवरही समन्वय समिती कार्यरत राहील असे यावेळी निश्चित करण्यात आले.