कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 01:32 PM2020-01-21T13:32:19+5:302020-01-21T13:33:40+5:30
कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे.
शिवाजी गोरे
दापोली/रत्नागिरी : कोकणातील पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना झाली असून या हापूस आंबा पेटीला चांगला दर मिळण्याची बागायदार शेतकऱ्याला आशा आहे.
यंदाच्या हंगामातील रत्नागिरी जिल्ह्यातील कौस्तुभ लिमये या शेतकऱ्याची दापोली तालुक्यातुन पहिली हापूस आंबा पेटी वाशी मार्केट ला रवाना झाली आहे.
यावर्षी पाऊस लाबल्याने आंबा पीक उशिरा येण्याची शक्यता वर्तविली जात आहे , पाऊस लांबल्याने हापूस आंब्याच्या झाडांना मोहर उशिरा आला आहे, या वर्षी थंडी सुद्धा गायब झाली होती, त्यामुळे आंबा पिकावर परिणाम होऊन, हापूस आंबा मार्केटमध्ये उशिरा येईल असे वाटत आहे, मात्र असे असले तरीही दापोली तालुक्यातील प्रसिद्ध आंबा बागायतदार कौस्तुभ लिमये यांनी 20 जानेवारी रोजी वाशी मार्केटला आंबा पेटी पाठवण्याची किमया केली आहे.
एकीकडे आंबा बागायतदार संकटात सापडले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तर दुसरीकडे लिमये यांनी आपल्या बागेतील हापूसची पेटी वाशी मार्केट ला पाठवून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असल्याचे दाखवून दिले आहे.
कोकणातील अतिशय महत्त्वाचे असणारे हापुस आंबा पीक यावर्षी लांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून कोकणात थंडी चा गारठा वाढल्याने आंबा बागा चांगल्यात मोहरल्या आहेत, काही ठिकाणी तर आंबा झाडांना फळधारणा सुद्धा व्हायला लागले आहे, त्यामुळे हापुस बागायतदार शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
पुढील काही दिवस थंडी कायम राहिल्यास हापुस आंबा बागायतदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आडे गावातील लिमये या शेतकऱ्यांनी वाशी मार्केटला पहिली आंबा पेटी पाठवण्याचा बहुमान मिळवला असून पुढील काही दिवसातच अजून त्यांच्या आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल