पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये रत्नागिरीत

By मेहरून नाकाडे | Published: November 25, 2023 05:10 PM2023-11-25T17:10:53+5:302023-11-25T17:11:20+5:30

संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द कवी, कथाकार कुमार अम्बुज यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थान डाॅ. भालचंद्र मुणगेकर भूषविणार

First Progressive Literature Conference in Ratnagiri in December | पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये रत्नागिरीत

पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन डिसेंबरमध्ये रत्नागिरीत

रत्नागिरी : प्रगतिशील लेखक संघ, महाराष्ट्र व एस.पी.हेगशेट्ये काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले प्रगतिशील साहित्य संमेलन दि.१ ते ३ डिसेंबर रोजी रत्नागिरीत होणार आहे. संमेलनाचे उद्घाटन प्रसिध्द कवी, कथाकार कुमार अम्बुज यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थान डाॅ. भालचंद्र मुणगेकर भूषविणार असल्याची माहिती प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डाॅ. जी. के. एेनापुरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, संघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिध्दार्थ देवधेकर उपस्थित होते.

येथील एस.पी.हेगशेट्ये महाविद्यालयात होणाऱ्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून अभिजित हेगशेट्ये यांची निवड करण्यात आली आहे. प्रमुख अतिथी म्हणून नीरा अडारकर, सुभाष लांडे उपस्थित राहणार आहे. शुक्रवार दि.१ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता गोपाळबाबा वलंगकर साहित्यनगरीचे उद्घाटन उद्योजक किरण यामंत यांचे हस्ते हाेणार आहे. त्र्यंबक शंकर शेजवलकर मुख्य प्रवेशव्दाराचे उद्घाटन प्रमोद मुनघाटे यांचे हस्ते तर माधव कोंडविलकर ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महेंद्र कदम यांचे हस्ते होणार आहे. रात्री ८ वाजता कविता वाचनाचा कार्यक्रम होणार असून अध्यक्षस्थान अविनाश गायकवाड भूषविणार आहे.

शनिवार दि.२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता काॅम्रेड आर.बी.मोरे विचारमंच संमेलनाचे उद्घाटन कुमार अंबुज यांच्या हस्ते होणार असून संमेलनाचे अध्यक्ष डाॅ.भालचंद्र मुणगेकर, प्रगतिशील लेखक संमेलनाचे अध्यक्ष जी. के.एेनापुरे, स्वागताध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांची उपस्थिती लाभणार आहे. दुपारी दि.२ वाजता परिसंवाद होणार आहे. दुपारी ३.३० वाजता राजकारणातील नैतिकता याविषयावर परिसंवाद होणार आहे. परिसंवादाचे अध्यक्षस्थान विजय चोरमारे भूषविणार आहेत. सायंकाळी ६.३० वाजता कविता वाचन होणार आहे.

रविवार दि.३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुंदर माझी शाळा हा बालकवितेचा सांगितिक कार्यक्रम हाेणार आहे. त्यानंतर १०.३० वाजता काॅम्रेड शरद पाटील समजून घेताना परिसंवाद आयोजित केला आहे. नंतर सकाळी ११.३० वाजता कुमार गटासाठी काय वाचावं ? हा विशेष कार्यक्रम होणार आहे. दुपारी १.३० वाजता मुस्लिमांचे बहिष्करण : भारतीय लोकशाही व घटनेसमोरील आव्हाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानंतर ३ वाजता कोकणचे पर्यावरण : साहित्य आणि संघर्ष सहभाग हा परिसंवाद होणार आहे.

जिल्ह्यातील साहित्यप्रेमींनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष जी. के. एेनापुरे यांनी केले आहे.

Web Title: First Progressive Literature Conference in Ratnagiri in December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.