सार्वजनिक गटात ‘शांतीनगरचा राजा’ प्रथम
By admin | Published: September 1, 2014 09:17 PM2014-09-01T21:17:19+5:302014-09-02T00:02:37+5:30
गणेश सजावट स्पर्धा : घरगुती गटात संजय वर्तक विजेते
रत्नागिरी : के टी. व्ही. न्यूज चॅनेल, आर. के. डिजीटल आणि रत्नागिरी खबरदार ग्रुपतर्फे आयोजित श्री गणेश सजावट स्पर्धा २०१४ चा निकाल आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत सार्वजनिक गणेशोत्सव सजावट स्पर्धेत नाचणे येथील बाबा बार्इंग यांच्या ‘शांतीनगरचा राजा’ला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
टिळक आळी गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी व कोकण रेल्वे गणेशोत्सव मंडळ, रत्नागिरी यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. घरगुती गणेश सजावट स्पर्धेत कुवारबावचे संजय वर्तक, खानू येथील रविकांत राजाराम चव्हाण, बसणीतील सुनील गोपीनाथ शिवलकर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. येत्या १० सप्टेंबरला स्वयंवर मंगल कार्यालयात दुपारी ३ वाजता पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
आयोजकांतर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेला संयोजन समितीचे अध्यक्ष उमेश शेट्ये, सचिव अलिमिया काझी, खजिनदार हेमंत वणजु, सल्लागार रज्जाक काझी, ओंकार फडके, अल्पना संसारे, कोमल तावडे, दादा वणजु आदी पदाधिकारी उपस्थित होते. घरगुती गणेशोत्सव व सार्वजनिक गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात सजावट केली जाते. यामागे जे कलावंत दडलेले असतात, त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी यावेळी दिली. या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद लाभला असून, घरगुती सजावट स्पर्धेसाठी ३७, तर सार्वजनिक गणेश सजावट स्पर्धेसाठी १८ स्पर्धकांचे अर्ज प्राप्त झाले होते. दोन्ही गटांतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार, १० हजार, ५ हजार अशी रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. अन्य विजेते याप्रमाणे : सार्वजनिक सजावट स्पर्धा : उत्तेजनार्थ श्री रत्नागिरीचा राजा, मारुती मंदिर, रत्नागिरी. घरगुती सजावट स्पर्धेत उत्तेजनार्थ १) प्रशांत पाडावे, मिरजोळे, २) रमेश सावंत (जाकीमिऱ्या), ३) जीवन कोळवणकर (कुवारबाव). या स्पर्धेत विशेष उल्लेखनीय पारितोषिक चंद्रकांत सुपल, टीआरपी, रत्नागिरी, शशिकांत भिसे, खालची आळी, रत्नागिरी, शिरीष शिवगण, वळके पाली यांना जाहीर झाले आहे. बक्षीस वितरणाला पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे उपस्थित राहणार आहेत.(प्रतिनिधी)