कोकणातील पहिले गायक, वादक संमेलन रत्नागिरीत
By admin | Published: May 12, 2016 11:06 PM2016-05-12T23:06:25+5:302016-05-12T23:31:03+5:30
वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम : गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या सभागृहात रंगणार जुगलबंदी
रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये रविवार, दि. १५ मे रोजी गायक, वादक संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, कोकणात यावर्षी प्रथमच असा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम होत असल्याची माहिती रत्नागिरीतील प्रसिद्ध तबलावादक हेरंब जोगळेकर यांनी आज (गुरुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.हार्मोनियमवादक चैतन्य पटवर्धन यांनी व्हॉट्सअॅपद्वारे या संमेलनाची संकल्पना मांडली. त्यानंतर ग्रुप बैठक घेऊन १५ मे रोजी हे ‘गायक, वादक संमेलन’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात गायक व वादकांचा प्रामुख्याने सहभाग असणार आहे. यामध्ये शास्त्रीय गायन, सुगम गायन, वदन, नवीन रचना, फ्युजन, आदींचा समावेश आहे. शास्त्रीय गायनाने प्रारंभ तर फ्युजनने या संमेलनाची सांगता होणार आहे. या संमेलनामध्ये युवा कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांचा सहभाग असणार आहे. यावेळी गायनासह विविध वाद्यांची रंगत रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या सभागृहात १५ रोजी हे संमेलन होणार असून, सायंकाळी ५.३० ते ९ या कालावधीत होणाऱ्या अभंग, भक्तीगीत, भावनाट्य, गझल फ्युजन, आदी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा आनंद रसिकांना विनामूल्य घेता येणार आहे. याचबरोबर संगीत क्षेत्रातील नव्या-जुन्या कलाकारांच्या परिचयाबरोबरच या क्षेत्रातील घडामोडींबाबतही यावेळी चर्चा करण्यात येणार आहे. रत्नागिरीतील सांगितिक क्षेत्रात ज्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले, अशा जुन्याजाणत्या तसेच दिवंगत व्यक्तींवर तयार करण्यात आलेला खास लघुपट यावेळी दाखविण्यात येणार आहे. यात विनायकबुवा रानडे, भालचंद्रबुवा रानडे, चिंतामणी भागवत, विनायक जोशी, ‘अक्षत’चे सुहास पेंडसे, यशवंतराव पटवर्धन, राम गोवेकर, भगवान किलेकर, आदींचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात प्रसिद्ध संगीततज्ज्ञ, नृत्यगुरू बाळासाहेब हिरेमठ, हार्मोनियमवादक श्रीकृष्ण मुळ्ये, प्रसिद्ध शास्त्रीय गायक नाट्य कलावंत आनंद प्रभुदेसाई तसेच रत्नागिरीत पहिल्यांदा वाद्यवृंद मैफल संकल्पना सुरू करणारे विजय डाफळे यांचा यामध्ये समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच असे आगळेवेगळे संमेलन भरत असून, रसिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)
डिरेक्टरीचा मानस
रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकार मंडळी आता एकत्र येऊ लागली आहेत. त्यामुळे आता प्रत्येक तालुक्यातील कलाकारांची डिरेक्टरी काढण्याचा मानस असल्याचे जोगळेकर यांनी सांगितले.