आधी मतदान मग लग्न! गुहागरमध्ये नवरदेव मंडपात जाण्याआधी पोहोचला मतदान केंद्रावर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2022 01:36 PM2022-12-18T13:36:48+5:302022-12-18T13:38:40+5:30
लग्नाला जाण्यासाठी नवरदेव तयारी करून बाहेर पडला. मात्र, त्याने लग्न मंडपात न जाता थेट मतदान केंद्रावर हजेरी लावली.
संकेत गोयथळे
गुहागर - तालुक्यात २१ ग्रामपंचायतीच्या मतदानाची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येकजण मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर आधी मतदान करुन मग अन्य कामांना महत्त्व दिले जात आहे. गुहागर तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी चक्क नवरदेव मंडपात जाण्याआधी मतदान केंद्रावर पोहोचला आणि त्याने मतदानाचा हक्क बजावला.
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच रणधुमाळी जाेरात सुरु आहे. त्यातच लग्नाचे मुहूर्तही भरपूर असल्याने लग्नाची धामधूमही सुरू आहे. त्यामुळे अनेकांनी सकाळी लवकर मतदान करुन लग्नाला जाणे पसंत केले. तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीचीही सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे. चिखली ग्रामपंचायतीत कर्मचारी असलेल्या अभिषेक अशोक गोयथळे या तरुणाचे रविवारी (१८ डिसेंबर) लग्न होते.
हे लग्न तालुक्यातील पालपेणे येथे होते. लग्नाला जाण्यासाठी नवरदेव तयारी करून बाहेर पडला. मात्र, त्याने लग्न मंडपात न जाता थेट मतदान केंद्रावर हजेरी लावली. नवरदेवाच्या पोशाखात आलेल्या अभिषेकने आधी मतदानाचा हक्क बजावला मग तो लग्नासाठी निघून गेला. लग्नाची धामधूम सुरू असतानाच अभिषेकने लग्नाआधीच मतदानाचा हक्क बजावण्याला प्राधान्य दिले. लग्न मुहूर्ताआधीच ग्रामपंचायतीच्या मतदानाला प्राधान्य देत त्याने जबाबदार नागरिक असल्याचेही दाखवून दिले.