जिल्ह्यात पाण्याचा पहिला टॅँकर लांजात
By admin | Published: March 18, 2016 10:37 PM2016-03-18T22:37:14+5:302016-03-18T23:39:59+5:30
धावडेवाडी : गतवर्षीपेक्षा चार दिवस उशिराने पोहोचली झळ
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याला हळूहळू पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. लांजा तालुक्यामध्ये पाणीटंचाई सुरु झाली असून, येथील पालू, चिंचुर्टी गावातील धावडेवाडीमध्ये आज (शुक्रवारी) प्रशासनाचा जिल्ह्यातील पहिला टँकर धावला. दरवर्षी खेडमध्ये धावणारा पहिला पाण्याचा टॅँकर यावर्षी लांजा तालुक्यात धावला आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते़ येथील लोकांना सोडाच जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत़ जिल्ह्यात आत्तापासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे.
गतवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून खेड तालुक्यातील खवटी येथील धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाईला सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात शासनाकडून या वाडीला १४ मार्चपासून टँकरने पाणी पुरवठा करण्यास प्रारंभ झाला होता़ जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवते. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे़ मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़
मागील वर्षी पावसाळ्यानंतर २ आॅक्टोबरपासून जिल्हा परिषद कृषी विभागाने ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या तत्वावर श्रमदानातून बंधारे उभारण्यास सुरुवात केली होती. यामध्ये वनराई, कच्चे बंधारे यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त बंधारे उभारण्यात आल्याने त्याचा फायदा पाणीटंचाई दूर करण्यासाठी झाला. कारण गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे जिल्ह्यात लवकरच पाणीटंचाई सुरु होण्याची शक्यता होती. मात्र, बंधारे बांधल्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी, तलाव, विंधन विहिरींतील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्याचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी खवटी धनगरवाडीमध्ये जिल्हा प्रशासनाचा पहिला टँकर धावला होता. यंदा लांजा तालुक्यातील पालू व चिंचुर्टी गावांमधील धावडेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. धावडेवाडी ही लांजापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसली आहे. ही माचाळ या अतिउंच डोंगराळ गावाच्या जवळपास आहे.
यंदा गतवर्षीपेक्षा ४ दिवस उशिरा जिल्ह्यात पाण्याचा पहिला टँकर धावला. टंचाईग्रस्त गावांसाठीचा यावर्षीचा पहिला टँकर पालू, चिंचुर्टी गावातील धावडेवाडी येथे धावला आहे. (शहर वार्ताहर)
दरवर्षी खेडात टॅँकर : मार्च महिन्यातच टंचाईला सुरूवात
गतवर्षी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये खवटी गावातील धनगरवाडीमध्ये पाणीटंचाई उद्भवल्याने पाण्याचा पहिला टँकर धावला होता. दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लांजा तालुक्यात पाणीटंचाईला प्रारंभ होतो. मात्र, यंदा मार्च महिन्यातच पाणीटंचाईची झळ पोहचली आहे.
ग्रामीण भागातील डोंगरकपारीतील धनगरवाड्यांमध्ये पाणीटंचाई कायम.
जिल्हा परिषदेंतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे टंचाई दूर.
मिशन बंधारे
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने पाणीटंचाईची झळ बसणार हे निश्चित झाले होते. ही पाणीटंचाई टाळण्यासाठी जिल्हा परिषदेंतर्गत वनराई बंधारे मोहीम हाती घेण्यात आली होती. यामुळे काही ठिकाणी पाणीटंचाईची झळ अद्याप बसलेली नसल्याचे दिसत आहे.