खेड तालुक्यातील खवटी - धनगरवाडीत धावला पहिला पाण्याचा टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:58+5:302021-04-02T04:32:58+5:30

रत्नागिरी : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टॅंकर खेड तालुक्यातील खालची ...

The first water tanker ran in Khawati-Dhangarwadi in Khed taluka | खेड तालुक्यातील खवटी - धनगरवाडीत धावला पहिला पाण्याचा टँकर

खेड तालुक्यातील खवटी - धनगरवाडीत धावला पहिला पाण्याचा टँकर

googlenewsNext

रत्नागिरी : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असतानाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आहे. जिल्ह्यात पहिला पाण्याचा टॅंकर खेड तालुक्यातील खालची धनगरवाडी येथे धावला आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा प्रशासनाचा पहिला टॅंकर खेड तालुक्यातच धावला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. त्यामुळे धनगर वस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगर-दऱ्यातून पायपीट करावी लागते. येथील लोकांना तर सोडाच, जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत.

फेब्रुवारी महिन्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला होता. तसेच यंदा डिसेंबर महिन्यापर्यंत उशिरा पाऊस सुरू होता. जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही खडकाळ जमिनीमुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़. त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे़. मात्र, त्याकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे़.

गतवर्षी चिपळूण तालुक्यातील तिवरे गावठाण नवीन वसाहतीमध्ये दि. १२ फेबुवारी २०२० रोजी पहिला टँकर धावला होता. यंदा खेड तालुक्यातील खवटी गावातील खालची धनगरवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. खवटी खालची धनगरवाडी हे खेड तालुक्याचे शेवटचे टोक असून रायगड जिल्ह्याच्या पोलादपूर तालुक्याला लागूनच हे गाव डोंगरात वसलेले आहे. त्यामुळे येथे दरवर्षी भीषण पाणीटंचाई उद्भवते. यंदा गतवर्षीपेक्षा १८ दिवस उशिरा जिल्ह्यात टंचाईग्रस्तांसाठी खवटी खालची धनगरवाडी येथे पहिला टँकर प्रशासनाकडून धावला.

चौकट

टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात ६८ गावांतील १५३ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा १६ कोटी ४३ लाख ३४ हजार रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार शासनाने जिल्ह्यात टंचाईग्रस्तांना टँकरने पाणी पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे.

चौकट

रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्वरूपानंदनगर येथील २४ विहिरी दूषित पाण्यामुळे दूषित झाल्या होत्या. या दूषित पाण्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून शिरगाव ग्रामपंचायतीच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात आला आहे.

Web Title: The first water tanker ran in Khawati-Dhangarwadi in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.