रासायनिक पाण्याने पुन्हा मासे मृत
By admin | Published: June 21, 2016 09:28 PM2016-06-21T21:28:08+5:302016-06-22T00:16:08+5:30
कोतवली सोनपात्रा नदी : एकाच महिन्यात तीनवेळा घटना घडल्याने ग्रामस्थांमधून संताप
आवाशी : खेड तालुक्यातील कोतवली येथे सोनपात्रा नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याने मासे मृत होण्याच्या घटना सातत्याने सुरु आहेत. या महिन्यातील ही तिसरी घटना असून, पावसाळा सुरु होताच औद्योगिक वसाहतीतील अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतून रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडल्याने कोतवली येथील सोनपात्रा नदी दूषित झाली आहे. त्यामुळे नैसर्गिक पाणवठेही दूषित झाले असून, या परिसरातील जनतेचा व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या अगोदर मे महिन्यामध्ये नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याची घटना घडली होती. त्यानंतर सी.ई.टी.पी. लाईनच्या मागच्या बाजूला हे रासायनिक पाणी पिऊन बैल मृत झाल्याची घटना दहा दिवसांपूर्वीच घडली होती. त्यावेळी कोतवली ग्रामस्थ व सी.ई.टी.पी. संचालक यांच्यात या विषयावरुन खडाजंगी उडाली होती. संचालक मंडळाचा राजीनामा घेण्यापर्यंत हे प्रकरण गेले होते. या प्रकरणावर पडदा पडतो न पडतो तोच पुन्हा नदीत मासे मेल्याने हे प्रकरण आता चांगलेच तापल्याचे दिसत आहे.
औद्यागिक वसाहतीत अनेक ठिकाणी सांडपाणी वाहून नेणारे चेंबर ओव्हरफ्लो झाल्याने हे रासायनिक सांडपाणी उघड्यावर वाहत असल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर कोतवली ग्रामस्थांसह आवाशी येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख सतीश आंब्रे, संजय आंब्रे, विक्रांत साने, प्रवीण कदम यांनी सी.ई.टी.पी. व एम.पी.सी.बी.च्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करत संताप व्यक्त केला. त्याचबरोबर या सांडपाण्याचे नमुने घेऊन हे पाणी कोणत्या कंपनीतून सोडण्यात आले याची माहिती एम.पी.सी.बी.कडे मागितली आहे.
एम.आय.डी.सी.चे उपअभियंता के. डी. पाटेकर यांनी सांगितले की, ही घटना समजताच मी तत्काळ तेथे पोहचलो. वसाहतीत ओवरफ्लो झालेल्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या चेंबरची पाहणी करून तूर्त त्याचे काम अद्ययावत होईपर्यंत पाणी सोडू नये अशा सूचना वसाहतीतील सर्व कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. वारंवार चेंबर ओव्हरफ्लो का होतात, असे विचारले असता, पाटेकर यांनी सांगितले की, या चेंबरमध्ये आम्हाला अनेकदा रिकाम्या बाटल्या, कचऱ्याच्या गोण्या व अन्य साहित्य सापडले आहे. आम्ही अनेकदा वसाहतीतील कंपन्यांना सांडपाण्याच्या लाईनला सांडपाण्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही वस्तू येता नयेत, असे लेखी बजावले आहे. तरीदेखील कंपन्यांकडून असे प्रकार घडत असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
संपर्क करत नाहीत : अहवाल पाठविणार
कोतवली गावामध्ये सतत असे प्रकार घडत असून, आज औद्योगिक वसाहतीतील चेंबर ओव्हरफ्लो झाले. याच्या पाहणीसाठी अधिकारी येतात, तेव्हा ते कुणालाही संपर्क करत नाहीत. आजही कोतवली ग्रामस्थांना समजावणे मला हाताबाहेर गेले होते. मात्र, पुन्हा अशी संधी मिळणार नाही, असे त्यांनी मला बजावले. मी अभ्यास गटावर असून देखील मला याची कल्पना नसणे याचा अर्थ काय? उलट मलाच माझ्या माणसांचा रोष घ्यावा लागतो. अधिकाऱ्यांचे हे नेहमीचेच आहे. अधिकारी पाहणीसाठी आले तरी कुणालाही संपर्क करत नाहीत.
- संदीप आंब्रे
अभ्यास गट सदस्य
एम.पी.सी.बी.कडे संपर्क साधला असता, प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी मोरे हे रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी यांचेसोबत सभेला असून, मी स्वत: कोतवली येथे जाऊन आलो. किरकोळ मासे मर्तुकी घडली असून, त्याचा पंचनामा करण्यात आला आहे. याचा अहवाल प्रयोगशाळा व वरिष्ठांकडे पाठविणार आहे. कोतवली सरपंच यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही, असेही एम.पी.सी.बी.चे क्षेत्रीय अधिकारी वी. जी. भताने यांनी सांगितले.