रत्नागिरी: वातावरणातील बदलामुळे मासे गायब, मच्छीमार संकटात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 05:37 PM2022-10-25T17:37:10+5:302022-10-25T17:37:44+5:30
खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे.
रत्नागिरी : सततच्या वातावरणातील बदलामुळे मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे मच्छीमार आर्थिक संकटात सापडले आहेत.
मासेमारी हा कोकणातील प्रमुख व्यवसाय असून, रत्नागिरी जिल्ह्यातील हजारो कुटुंबं मासेमारी या व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली तरी पावसाळ्यानंतर मासेमारी सुरू झाल्यापासून वातावरणात होत असलेल्या सततच्या बदलाचा मोठा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. त्यामुळे मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारी पाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरू आहे. मात्र, मासे मिळेनात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय खलाशांचाही प्रश्न अजूनही सतावत आहे. मासेमारी सुरू झाल्यानंतर एकापाठोपाठ वादळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश वेळा मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरून ठेवण्यात येतात. तसेच खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणारा मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास मच्छीमारांसमोर मोठे आर्थिक संकट निर्माण होणार आहे.
आर्थिक कोंडीमुळे घडी विस्कटली
कर्जाचे ओझे, डिझेलचा खर्च, बर्फ, खलाशांचा वेतन व भत्ता, जाळी, इंजिन दुरुस्ती आदींवर दररोज होणारा हजारो रुपये खर्च आणि मासे विकून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न याचा ताळेबंदच जुळत नसल्याने मच्छीमार हैराण झाले आहेत. बँकेचे कर्ज, व्याज तसेच व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या अनामत रकमेची परतफेड होत नसल्याने मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे.