लाेट्यात पुन्हा सांडपाणी साेडल्याने नाल्यातील मासे मृत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:21 AM2021-06-22T04:21:55+5:302021-06-22T04:21:55+5:30
आवाशी : लाेटे-परशुराम (ता. खेड) औद्याेगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी साेडण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही़ पीरलाेटे येथे साेमवारी पुन्हा सांडपाणी ...
आवाशी : लाेटे-परशुराम (ता. खेड) औद्याेगिक वसाहतीतील रासायनिक सांडपाणी साेडण्याची समस्या अजूनही सुटलेली नाही़ पीरलाेटे येथे साेमवारी पुन्हा सांडपाणी साेडण्यात आल्याने नाल्यातील मासे मृत झाल्याची घटना घडली.
लाेटे-परशुराम येथील रासायनिक उद्याेग वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्सेस कंपनीच्या मागील बाजूने वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यात कुणी अज्ञाताने रासायनिक सांडपाणी साेडल्याने नाल्यातील विविध जातीचे मासे मृत झाल्याची घटना ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहे. सुप्रिया कंपनीच्या मागील बाजूस असणारा केतकीचा पऱ्या हा पीरलाेटे गावठण वाडीतून पूर्वेकडे असणाऱ्या चिरणी गावच्या नदीला जाताे. पुढे हाच पऱ्या आंबडसमार्गे वाशिष्टी नदीच्या पात्रात मिसळताे. रविवारी रात्री याच पऱ्याला अज्ञात कंपनीने रासायनिक सांडपाणी साेडल्याने पऱ्यातील विविध जातीचे मासे मृत झाल्याची घटना येथील ग्रामस्थ जनार्दन चाळके, विलास आंब्रे, नितीन चाळके व अन्य ग्रामस्थांच्या निदर्शनास आली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा केतकीचा पऱ्या पीरलाेटे गावठण क्षेत्रातून भरवस्तीतून बारमाही वाहत असताे. गेले दाेन दिवस पावसाचा जाेर कमी असल्याने त्याचा प्रवाह मंद गतीने सुरू आहे. साेमवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान या पऱ्याच्या किनाऱ्याला मृत मासे दिसले. खरंतर या भागात सुप्रिया कंपनीव्यतिरिक्त दुसरी काेणतीही कंपनी नाल्यालागत नाही. त्यामुळे याच कंपनीने रासायनिक सांडपाण्याचा निचरा केला असावा, अशी शक्यता असल्याचे सांगितले़
-------------------
एमपीसीबीवर विश्वास नाही
या घटनेची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली आहेत का? अशी विचारणा केली असता, एमपीसीबीचे काम किती विश्वासदर्शक व पारदर्शक आहे हे संपूर्ण पंचक्राेशीला माहीत आहे. त्यांना जर का? कळविले तर ते नेहमीप्रमाणे नमुने घेणार लगतच्या कंपनीत जाणार आणि अखेर त्याचा अहवाल निरंक येणार हे नेहमीचेच आहे. त्यामुळे ठाेस अशी कारवाई त्यांच्याकडून कधी हाेतच नाही, असे ग्रामस्थांनी सांगितले.
------------------------------
कारवाई हाेतच नाही
दाेन वर्षांपूर्वी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला रासायनिक पाणी याच भागातील वाड्यातून आले हाेते. त्यावेळी संंबंधित ग्रामपंचायतीने एमपीसीबीला याचा शाेध घेण्यासाठी कळविले हाेते. मात्र, आज इतकी वर्षे उलटूनही संबंधित कंपनीचे नाव उघड हाेऊ शकला नाही वा त्यावर काहीच कारवाई नाही. हे या आजच्या घटनेने समाेर आले आहे.
---------------------
किती वर्ष त्रास सहन करायचा
वसाहतीतील हर्डेलिया कंपनीच्या माेकळ्या जागेतून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात मिसळलेले रासायनिक सांडपाणी पिऊन गुणदे तलारीवाडी येथील शेतकरी यशवंत आखाडे यांच्या चार म्हशी दगावल्या हाेत्या तर सहा म्हशी गंभीर अवस्थेत पडल्या. ही घटना ताजी असतानाच मासे मरण्याची घटना पुन्हा समाेर येत आहे. सांडपाण्याचा त्रास किती वर्षे सहन करावा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़