मासेमारीचा मार्ग बनला धोकादायक
By admin | Published: August 18, 2016 11:34 PM2016-08-18T23:34:14+5:302016-08-18T23:34:21+5:30
मांडवी बंदर : भाट्ये खाडीमुखाशी गाळ
रत्नागिरी : शहरालगत भाट्ये खाडीमुखाशी असलेल्या मांडवी बंदरामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून गाळ साचल्याने मासेमारीचा मार्गच धोकादायक बनला असून, मच्छीमार अडचणीत आले आहेत.
भाट्ये खाडीकिनारी वसलेल्या राजिवडा, भाट्ये, कर्ला, फणसोप आणि जुवे या परिसरातील मासेमारी नौकांना खोेल समुद्रात मासेमारीला जाण्यासाठी भाट्ये खाडीचे मुख असलेले मांडवी बंदर हा एकमेव मार्ग आहे. मांडवी बंदरातून मच्छीमारांना जीव मुठीत धरुनच खोल समुद्रात जावे लागते. अनेक वर्षांपासून मांडवी बंदरातील गाळ उपसण्याबाबत राजिवडा, भाट्ये, कर्ला व अन्य गावांमधील मच्छीमारांकडून मत्स्य खात्याकडे सातत्याने मागणी करण्यात आली आहे. सातत्याने याबाबत मत्स्य खात्याला निवेदन देऊन बंदरातील गाळ उपसण्याबाबत साकडे घातले जाते. मात्र, अद्यापही शासनाला बंदरातील गाळ उपशासाठी मुहूर्त मिळालेला नाही.
निवडणुका आल्या की मांडवी बंदरातील गाळ उपशाबाबत सर्वच राजकीय पक्षाचे पुढारी, नेते व उमेदवार आश्वासने देतात. मात्र, ते आश्वासन निवडणुकीनंतर हवेत विरते. त्यामुळे नाईलाजास्तव मच्छीमारांना मृत्यूचा सापळा बनलेल्या मांडवी बंदरातून खोल समुद्रात मासेमारीसाठी जावे लागते. (शहर वार्ताहर)
नौका उलटली : गाळाचा प्रश्न ‘जैस थे’
भाट्ये खाडीच्या मुखाशी असलेल्या मांडवी बंदरामध्ये गाळ साचल्याने अनेकदा नौका उलटून बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये काही मच्छीमारांना जीवही गमवावा लागल्याने त्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. तरीही शासनाकडून या बंदरातील गाळाच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.