मत्स्योद्योग शाळेची इमारत खिळखिळी

By Admin | Published: May 20, 2016 10:30 PM2016-05-20T22:30:09+5:302016-05-20T22:45:45+5:30

शिक्षणाचे भिजत धडे : शाळेच्या दुरवस्थेकडे साऱ्यांचेच दुर्लक्ष...!

Fisheries school building | मत्स्योद्योग शाळेची इमारत खिळखिळी

मत्स्योद्योग शाळेची इमारत खिळखिळी

googlenewsNext

रत्नागिरी : राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्याचे दिवसांमध्ये शाळेत गळतीचे प्रमाण मोठे असल्याने विद्यार्थ्यांना भिजत शिक्षणाचे धडे घ्यावे लागतात. शाळेच्या या दुरवस्थेकडे कोणीही लक्ष देत नसल्याने ही शाळा जिल्हा परिषद किंवा मत्स्य विभाग यापैकी कोण चालवते, हा प्रश्न पालकांना सतावत आहे.
जिल्ह्यात रत्नागिरी शहरातील राजिवडा आणि राजापूर तालुक्यातील साखरीनाटे या दोन शाळा मत्स्योद्योग विभागाच्या अखत्यारीत आहेत. या दोन्ही शाळांमध्ये बहुतांशी मच्छीमारांची मुले शिकत असून, त्यांच्यासाठी मासेमारीशी संबंधित मत्स्योद्योग आणि सुतारकाम हे इतर शाळांपेक्षा वेगळे विषय येथे शिकवले जातात. या शाळेतील विद्यार्थ्यांना हे संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात येते. यासाठी आवश्यक पाठ्यपुस्तके ही शासनाकडून देण्यात येतात.
मात्र, तीन वर्षांपूर्वी या दोन्ही शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आल्या. तेव्हापासून या शाळेतील शिक्षकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. या शाळा जिल्हा परिषदेकडे वर्ग केल्यापासून शिक्षकांचे वेतन वेळेवर होत नसल्याची ओरड सुरु झाली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन एप्रिल महिन्यामध्ये झाले. मात्र, या मत्स्योद्योग शाळांमधील शिक्षकांना मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांचे वेतन मिळण्यासाठी मे महिन्यापर्यंत वाट पहावी लागली.
यामुळे शाळेतील शिक्षकवर्ग अडचणीत आला आहे. यापैकी राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. या शाळेच्या छप्पराची कौले फुटली आहेत तसेच छप्पराचे लाकडी वासेही मोडकळीला आले आहेत. या शाळेचे व्यवस्थापन जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले. मात्र, शाळेची जागा, इमारत अद्यापही जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाळा दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेकडून झटकण्यात येते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये छपरातून गळती लागते. त्यामुळे अनेकदा विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके, वह्या भिजून शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे राजीवडा येथील ही शाळा शासनाच्या मत्स्योद्योग खात्याकडे आहे की, जिल्हा परिषदेकडे, हा प्रश्न येथील रहिवाशांसह पालकांनाही सतावत आहे. मत्स्योद्योग खाते आणि जिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराचा फटका शिक्षक व विद्यार्थ्यांना बसत आहे. (शहर वार्ताहर)

साखरीनाटेतील शाळाही जिल्हा परिषदेकडे : राजिवड्यातील दुरुस्तीसाठी टाळाटाळ का?
राजिवडा शाळेची इमारत व जमीन जिल्हा परिषदेच्या नावे नाही. त्यामुळे शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करता येत नसल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे. मत्स्योद्योग खात्याची राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील प्राथमिक शाळाही जिल्हा परिषदेकडे आहे. या शाळेच्या दुरुस्तीचे काम जिल्हा परिषदेच्या खर्चातून करण्यात आले आहे. मात्र, राजिवडा येथील मत्स्योद्योग शाळेची दुरुस्ती करण्यास जिल्हा परिषदेकडून टाळाटाळ केली जात आहे. साखरीनाटेच्या शाळेची इमारत व जमीन नावे नसताना जिल्हा परिषदेने तिची दुरुस्ती कशी केली? असा प्रश्न पालकवर्गाकडून उपस्थित केला जात आहे.


राजिवडा शाळेच्या छप्पराची कौले फुटलेली असल्याने पावसाचे पाणी वर्गात झिरपून विद्यार्थ्यांची वह्या, पुस्तके भिजतात. त्यासाठी गेल्या वर्षी एका वर्गखोलीची कौले शिक्षक, विद्यार्थ्यांनी वर्गणी गोळा करुन बदलली. मात्र, अन्य वर्गखोल्यांची कौले अजूनही फुटलेलीच आहेत. ती न बदलल्यास पावसाच्या पाण्यामध्येच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घ्यावे लागणार आहेत.

Web Title: Fisheries school building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.