रत्नागिरीतील मांडवी किनारी नाैका बुडाली; एकजण बेपत्ता, चाैघांना वाचविण्यात यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2022 11:23 AM2022-08-21T11:23:47+5:302022-08-21T11:24:22+5:30
ही नाैका राजीवडा येथील इम्रान साेलकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन नाैका असून, ‘इब्राहीम’ असे या नाैकेचे नाव आहे.
- रहिम दलाल/तन्मय दाते
रत्नागिरी : मांडवी बंदराच्या मुखाशी भरलेल्या गाळामुळे राजीवडा येथील मासेमारी नाैका बुडाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता रत्नागिरी शहरातील मांडवी समुद्रकिनारी घडली. या बाेटीतील चाैघांना वाचविण्यात यश आले असून, एकजण बुडाला आहे. ओवेस अजूम मखी (२१, रा. जयगड) असे बेपत्ता झालेल्या खलाशाचे नावे आहे.
ही नाैका राजीवडा येथील इम्रान साेलकर यांच्या मालकीची मिनी पर्ससीन नाैका असून, ‘इब्राहीम’ असे या नाैकेचे नाव आहे. ही नाैका जयगड येथील खलील साेलकर यांनी करारावर घेतली आहे. या नाैकेवर जयगड येथील फईम पाईक शेख (२१), उजेफा निजामुद्दीन मुल्ला (२१), अफरान महेबुब मुजावर (२२), अय्याज गुलाब माखजनकर (२६) आणि ओवेस अजूम मखी पाच खलाशी हाेते. हे सर्वजण जयगड येथील राहणार असून, रविवारी सकाळी मिरकरवाडा येथे नाैका दुरुस्तीसाठी नेत हाेते.
तेथे नाैका दुरुस्त करुन ते जयगड येथे जाणार हाेते. समुद्र खवळलेला असल्याने आज नाैका नेऊ नका, असे इम्रान साेलकर यांनी खलाशांना सांगितले हाेते. मात्र, तरीही पाचजण ही नाैका घेऊन निघाले हाेते. मांडवी बंदराच्या मुखाशी माेठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नाैकांना मासेमारीसाठी जाताना अडचण येत आहे. या गाळात ही नाैका फसल्याने मांडवी समुद्रकिनारी नाैका बुडाली.
ही नाैका बुडाल्याची माहिती मिळताच राजीवडा व भाटकरवाडा येथील नाैकांच्या सहाय्याने चाैघांना वाचविण्यात यश आले. मात्र, नाैकेवरील ओवेस अजूम मखी हा खलाशी बेपत्ता झाला असून, त्याचा शाेध सुरु आहे. स्थानिक मच्छिमारही त्याठिकाणी दाखल झाले असून, तेही बेपत्ता खलाशाचा शाेध घेत आहेत. उर्वरीत चारजणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.