वादळाच्या इशाऱ्यामुळे मच्छीमार भीतीच्या छायेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:32 AM2021-05-13T04:32:16+5:302021-05-13T04:32:16+5:30
रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका ...
रत्नागिरी : अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असल्याने हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. एकीकडे अवकाळी पावसाचा धोका असतानाच दुसरीकडे चक्रीवादळाचे संकट येणार आहे. त्यामुळे मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे आधीच मच्छीमार आर्थिक संकटात असताना आता वादळाने नुकसान झाल्यास ते सोसणार कसे, या काळजीत मच्छीमार पडले आहेत.
दक्षिण अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत असून, ते पुढे उत्तर पश्चिमेला सरकण्याची शक्यता आहे. यामुळे १४ मे रात्रीपासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणारे लोक आणि मच्छीमारांना हाय अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर सर्व मच्छीमारांना व नौकांना खोल समुद्रातून किनारी परतण्याचा इशारा दिला आहे. तसेच पुढचे काही दिवस समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चालू मासेमारी मोसमामध्ये मच्छीमारांना अनेकदा वादळांना सामोरे जावे लागले आहे. त्यामध्ये निसर्ग वादळाने किनारपट्टीवरील मच्छीमारांची कोट्यवधी रुपयांची हानी केली होती. त्याचबरोबर बागायतदार, शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसला होता. त्यापूर्वी फयान वादळाने तर मच्छीमारांचे कधीही न भरून येणारे नुकसान केले होते. त्यामध्ये अनेक मच्छीमार दगावले होते. अनेक जण आजपर्यंत बेपत्ता आहेत. अशा प्रकारे अनेकदा आलेल्या वेगवेगळ्या वादळांनी मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढवले आहे. एकूणच वर्षभरातील वादळी स्थिती आणि कोरोना यांच्यामुळे मासेमारी बंद असल्याने मच्छीमारांना रोजच्या जगण्यासाठीही धडपड करावी लागत आहे.