मच्छिमारांचे प्राधान्याने लसीकरण करणार : महेश नाटेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:20+5:302021-07-08T04:21:20+5:30
आबलोली : महिनाभरानंतर मच्छिमारीचा हंगाम सुरू होणार असून, मासेमारीसाठी समुद्रात जाणारे मच्छीमार बांधव दोन-चार महिने परत येत नाहीत. सध्याच्या ...
आबलोली : महिनाभरानंतर मच्छिमारीचा हंगाम सुरू होणार असून, मासेमारीसाठी समुद्रात जाणारे मच्छीमार बांधव दोन-चार महिने परत येत नाहीत. सध्याच्या कोरोना आपत्तीच्या काळात मच्छिमारांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे कोरोना लसीकरण होणे गरजेचे असून, प्राधान्याने त्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य महेश नाटेकर यांनी दिली.
त्यांनी सांगितले की, याविषयी जिल्हा परिषदेच्या सभेत चर्चा करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती उदय बने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी मच्छिमारांच्या लसीकरणाबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छिमारांना लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लस दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य नाटेकर यांनी दिली.
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने समुद्रात जाणाऱ्या मच्छिमारांनी कोरोना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महेश नाटेकर यांनी केले आहे.