मत्स्य मंत्र्यांच्या लेखी पत्रानंतर मच्छिमारांचे आंदाेलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:32 AM2021-04-02T04:32:50+5:302021-04-02T04:32:50+5:30
मत्स्यमंत्री अस्लम शेख यांचे लेखी पत्र दापाेलीतील मच्छिमारांतर्फे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले. लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : ...
मत्स्यमंत्री अस्लम शेख यांचे लेखी पत्र दापाेलीतील मच्छिमारांतर्फे तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे देण्यात आले.
लाेकमत न्यूज नेटवर्क
दापोली : दापोली - मंडणगड - गुहागर मच्छिमार संघर्ष समितीचे गेले १२ दिवस बेकायदेशीर एलईडीविरोधात सुरू असलेले उपोषण मत्स्यमंत्री अस्लम शेख यांनी दिलेल्या लेखी पत्रानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे मच्छिमारांनी दिले. सरकारने एक महिन्याच्या कालावधित दिलेले आश्वासन पाळले नाही, तर पुन्हा मच्छिमार बांधव उग्र आंदोलन करतील, असा इशारा मच्छिमार संघटना नेते पी. एम. चौगुले यांनी दिला आहे.
अरबी समुद्रात एलईडी, फास्टर, पर्ससीन बोटीच्या आधारे अवैध मासेमारी सुरू आहे. याविरोधात दापोली - मंडणगड - गुहागर मच्छिमार कृती संघर्ष समितीचे कार्यकर्ते व पारंपरिक मच्छिमार गेले बारा दिवस साखळी उपोषणाला बसले होते. या उपाेषणकर्त्यांची युवक काँग्रेसचे राज्य अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भेट घेऊन चर्चा केली हाेती. या चर्चेनंतर अस्लम शेख यांच्याशी बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये उपाेषण मागे घेण्याची विनंती करण्यात आली हाेती.
मंत्री अस्लम शेख यांनी, एक महिन्याच्या मुदतीत कायदा करण्याचे व एलईडी, फास्टर, पर्ससीन बोटीवर कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश माेहिते यांना दिले. त्यानुसार मच्छिमारांनी आपले उपोषण स्थगित केले आहे. मंत्री अस्लम शेख यांच्या आश्वासनाचे लेखी पत्र तहसीलदार वैशाली पाटील यांच्याकडे दिले.
यावेळी उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड, कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे, उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर, सचिव गोपीचंद चौगुले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते, जिल्हा सचिव संतोष शिर्के, उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर, शहराध्यक्ष शिराज रखांगे, माजी नगराध्यक्ष अविनाश केळस्कर, ॲड. योगेश दांडेकर, शिवसेनेचे शशिकांत चव्हाण, अरुण कदम, भगवान घाडगे, राजेंद्र पेठकर उपस्थित होते.