पिंजऱ्यातील मत्स्यशेतीचा ‘प्रयोग’ फसला!
By admin | Published: December 1, 2014 10:38 PM2014-12-01T22:38:52+5:302014-12-02T00:25:45+5:30
मिरकरवाडा : देखभालीतील त्रुटी ठरल्या मारक; नव्याने प्रकल्प सुरू करण्यास अनेक मत्स्य संस्था इच्छुक
प्रकाश वराडकर - रत्नागिरी -जगभरातील सागरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या पिंजऱ्यातील मत्स्यशेतीला (केज फीश कल्चर) कोकणच्या अरबी समुद्र क्षेत्रात मोठी संधी आहे. त्यासाठीच रत्नागिरी मिरकरवाडा येथील सागरात डिसेंबर २०१३मध्ये १२ पिंजरे लावून त्यात जिताडा व मोडोसा मत्स्यबीज सोडण्यात आले होते. मात्र, देखभालीतील काही तांत्रिक अडथळ्यांमुळे या प्रकल्पातून अपेक्षित मत्स्य उत्पादन मिळू शकले नाही. त्यामुळे प्रायोगिकतत्त्वावरील हा पहिला प्रयोग फसला आहे. मात्र, येत्या हंगामात हा प्रकल्प राबविण्यासाठी काही संस्था हिरीरीने पुढे येत असल्याची माहिती मत्स्य विभागाच्या सुत्रांकडून देण्यात आली.
महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाच्या तांत्रिक सहकार्यावर व स्थानिक मच्छिमारांच्या सहभागातून हा प्रकल्प १९ डिसेंबर २०१४ रोजी सुरू करण्यात आला होता. त्यासाठी मिरकरवाडा ते भगवती बंदर दरम्यानच्या समुद्रात किनाऱ्यापासून २०० मीटर अंतरावर पाण्यात अर्धे बुडालेले व काही भाग पाण्यावर असलेले १२ मोठे पिंजरे उभारण्यात आले होते. त्यामध्ये काही लाख रुपयांचे जिताडा व मोडोसा किमती मच्छिचे बीज सोडण्यात आले होते. मात्र, काही त्रुटींमुळे १२पैकी ५ पिंजऱ्यातील मत्स्यबीज नष्ट झाले. त्यामुळे ते ५ पिंजरे आधीच काढण्यात आले होते. मात्र, उर्वरित ७ पिंजऱ्यात चांगल्या प्रमाणात मासे मोठे झाले होते. ३ ते ४ किलो वजनापर्यंत मच्छिची वाढ झाली होती. परंतु देखभाल करणारे मच्छिमार त्यांचा मच्छिमारीचा व्यवसाय सांभाळून पिंजऱ्यातील मत्स्यशेतीची देखभाल करीत होते. त्यामुळे काही प्रमाणात देखभालीत त्रुटी राहिल्या.
लोखंडी पाईप्स व तरंगण्यासाठी असलेली प्लास्टिक पिंप यांच्या याआधारे तयार केलेल्या पिंजऱ्यांना बाहेरून पूर्णत: एलडीपीईचे जाळे लावण्यात आले होते. हे जाळे दर २० दिवस किंवा महिन्याने बदलण्याची आवश्यकता होती. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे मच्छिचे वजन वाढल्यानंतर कमकुवत जाळी तुटून त्यातून मच्छि सागरात निघून गेली, तर देखभालीतील त्रुटींमुळे काही मासे मरून गेले. काही मच्छिमारांनाही त्यांच्या जाळ्यात ही मच्छी मिळाली. सात पिंजरे पाण्यातून काढण्यात आले त्यावेळी २३२ किलो वजनाचे मासे मिळाल्याचेही सुत्रांनी सांगितले.
तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी कोकणच्या सागरी हद्दीत हा प्रकल्प व्हावा, यासाठी प्रोत्साहन दिले होते. जगाच्या पाठीवर असे पिंजऱ्यातील मत्स्यशेतीचे असंख्य प्रकल्प अस्तित्त्वात आहेत. त्यातून खात्रीशीर मत्स्य उत्पादन मिळत आहे. त्यामुळेच सर्वप्रथम रत्नागिरीच्या समुद्रात पिंजऱ्यातील मत्स्यशेती हा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात आला. या प्रकल्पावर काम करणाऱ्या मच्छिमारांनाही राहिलेल्या त्रुटी लक्षात आल्याने नव्याने हा प्रकल्प राबविण्यास आता अनेक संस्थांनी तयारी दर्शविल्याचे सुत्रांनी सांगितले.
मत्स्य उत्पादन केवळ २३२ किलो...
प्रकल्प यशस्वी होईल
सागरातील मच्छिमारी ही बेभरवशी असल्याने पिंजऱ्यातील मत्स्यशेती त्याला चांगला पर्याय आहक्षक्षत्रे. जगभरात हा यशस्वी झालेला प्रकल्प कोकणातही यशस्वी होईल. प्रायोगिक प्रकल्पातील त्रुटी दूर करून हा प्रकल्प पुन्हा यशस्वी करण्यासाठी काही संस्था पुढे आल्या आहेत. त्यामुळे येत्या हंगामात हा प्रकल्प यशस्वी होईल, असा विश्वास मत्स्य विभागाला वाटत आहे.
मिकरवाडा येथे सागरात उभारले होते मत्स्यशेतीचे १२ पिंजरे.
किमती जिताडा, मोडोसा मच्छिचे बीज सोडले होते पिंजऱ्यात.
महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाच्या माध्यमातून प्रायोगिक प्रकल्प.
मत्स्य महाविद्यालयाचे प्रकल्पाला तांत्रिक सहकार्य.
स्थानिक मच्छिमारांकडे होती देखभालीची जबाबदारी.
स्वतंत्रपणे देखभालीची गरज.
पिंजऱ्याचे जाळे तुटल्याने मासे गेले सागरी पाण्यात.